योगिनी मंदिर, भेडाघाट, मध्य प्रदेश

 

परिचय

भारताच्या मध्य भागामध्ये विखुरलेली चौसष्ठ योगिनी मंदिरे, विलक्षणअद्वितीय आणि गूढ आहेत. योगिनी मंदिरातील मूर्ती, त्या मंदिराची अनोखी वास्तुरचना , योगिनींचे  देवतामंडळातील स्थान, त्यांची उपासनापद्धती या सगळ्याच गोष्टी अभ्यासकांच्या मनात कुतूहल उत्पन्न करणाऱ्या आहेत. 

जबलपूरजवळील भेडाघाट इथे धुवांधार जलप्रपाताच्या कल्लोळानंतर, उंच संगमरवरी खडकांमधून पवित्र नर्मदा नदीचा प्रवाह संथपणे मार्गक्रमण करतो. नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर,  भैरवी घाटावर, जवळच्या टेकडीच्या माथ्यावर एक विशाल योगिनी मंदिर आहे.

इतर योगिनी मंदिराप्रमाणेच गोलाकार शिखरविहीन मंडप हे याही वास्तू रचनेचे वैशिठ्य आहे.  वर्तुळाकार बाह्य दगडी भिंतीवर प्रत्येक योगिनीसाठी कोनाडे आहेत. बहुतेक योगिनी मंदिरांमध्ये ६४ योगिनी मूर्ती असतात. मात्र, भेडाघाट योगिनी मंदिरामध्ये ८१ पूर्णाकार योगिनी मूर्ती मिळतात.

योगिनी म्हणजे व्याख्येनुसार, आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर असलेल्या स्त्री अभ्यासिका/उपासिका आहेत. ऐहिक जगाचा त्याग केलेल्या या तपस्विनी आहेत आणि मोक्षाचे सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी 'योग' मार्गाचा अवलंब केलेला आहे.

योगिनी मंदिरांची वर्तुळाकार रचना म्हणजे  योगिनींच्या शक्तिविद्यामंडळाचेच प्रतिबिंब आहे. वर्तुळामध्ये सामावलेल्या ऊर्जेचे आकाशगामी तत्व हे योगिनी मंदिराच्या शिखररहित मंडपामधून दिसते.  काही ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, हे एक वेगळ्या जगाला जोडणारे वर्तुळाकार प्रवेशद्वार आहे ज्याद्वारे योगिनीचा  समूह अवकाशात उड्डाण करू शकतो आणि कार्यसिद्धी नंतर परत येऊ शकतो

आठ मातृका (कधीकधी सात), नऊ दुर्गा याप्रमाणेच चौसष्ट योगिनी आहेत. कधी कधी सोळा तर कधी एक्याऐंशी योगिनीही असतात,  योगिनी या  शाक्त परंपरेतील देवी आणि शक्तीचे प्रकटीकरण आहे.

योगिनी ह्या मोक्षप्राप्तीच्या मार्गावरील अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या देवता स्वरूप शक्ती आहेत. काही प्राचीन ग्रंथानुसार, तुम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण केले तर तुम्हालाही त्या सिद्धी प्राप्त करण्यास मदत करतात. अनेक तांत्रिक अनुयायी, विधींचा एक भाग म्हणून आणि आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर असताना योगिनींची उपासना आणि पूजा करतात.



इतिहास

योगिनी मंदिरे बहुदा दुर्गम ठिकाणी आढळतात, मानवी पायरवांपासून दूर,टेकडीवर वसलेली किंवा जंगलात लपलेली असतात.

भैरवी घाटाजवळील एका छोट्या टेकडीवर हे योगिनी मंदिर आहे. सुमारे २०० पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचा गोलाकार बाह्य प्राकार दृष्टीपथास पडतो. या विशेष मंदिराचा बाह्य व्यास १३२ फूट आणि आतील व्यास ११६ फूट आहे.

येथील मध्यवर्ती मंदिर अगदी मध्यभागी नसून जरासे बाजूला आहे.  हे आतले गौरी-शंकर मंदिर बाह्य मंदिरापेक्षा वेगळे असून त्याचे छत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्वात मोठ्या योगिनी मंदिराच्या बाहेरील गोल भिंतीवर ८१ कोनाडे आहेत आणि प्रत्येक कोनाड्यात एक पूर्णाकृती योगिनी मूर्ती आहे. दुर्दैवाने  इथली मूळची प्रत्येक सुघड आणि सुबक मूर्ती, मध्ययुगीन आक्रमकांच्या घावांमुळे खंडित आणि विद्रुप झाली आहे.


साधारणतः इ.स. ९८० ते १०२५ या काळात कलचुरी घराण्याचा राजा युवराज द्वितीय याने हे मंदिर बांधले. या कलचुरी राजांची राजधानी योगिनी मंदिरापासून साधारण सात किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीच्या पलिकडे त्रिपुरी या ठिकाणी होती. भेडाघाटचे मूळ नाव भैरवघाट होते कारण या योगिनी मंदिरात मधोमध भैरव मूर्ती होती. योगिनींच्या बरोबर नेहमीच भैरव असतात. इ.स. ११५५ मधे गुर्जर प्रतिहार घराण्याच्या राजांनी इथे मधोमध गौरीशंकर मंदिर बांधले. त्यामुळे मधे ठेवलेली भैरव आणि नटराज मूर्ती सध्या गोलाकार देवळ्यांमधे दिसतात. आज या मंदिराला गावकरी  गोलकी मठ‘ म्हणतात.

गौरी-शंकर मंदिरात एक शिलालेख सापडला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की राणी अल्हानदेवी यांनी इ.स. 1120 मध्ये एक मंदिर बांधले होते. आता हा संदर्भ बाह्य योगिनी  मंदिराविषयी  आहे कि गौरी-शंकर मंदिराविषयी आहे ते संदिग्ध आहे.

कापालिक, कौल हे काही शैव संप्रदाय आणि काही शाक्त उपासक मार्ग जसेकी योगिनी तंत्र,   यामध्ये सिद्धी आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी काही बीभत्स उपचारांचा अवलंब करतात जसे कि रक्त प्राशन, प्रेत विधी. त्याचप्रमाणे मैथुन, मद्य अशा वामाचारांचा हि त्यात समावेश असे. तज्ज्ञांच्या मते, स्थानिक लहान देवता आणि त्यांचे विधी देखील या प्रथा आणि संप्रदायांमध्ये विलीन झाले.

योगिनी पंथाची महत्ता सहाव्या शतकाच्या आसपास वाढली असावी आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार नवव्या ते बाराव्या शतकात हा पंथ अधीक सक्रिय झाला असावा. त्याला बर् यापैकी राजाश्रय मिळाला आणि म्हणूनच  सध्याच्या ओडिशा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, सामान्यत: पूर्व भारतात त्याची अनेक मंदिरे उभारलेली दिसतात . ताकालीन राजघराणी देखील ह्या अलौकिक शक्तींशी निकटचा संबंध असलेल्या पंथाचे अनुयायी झालेले दिसतात ते मुख्यत्वे अधिक अतीमानवी संरक्षक सिद्धि आणि कवच मिळवण्यासाठी असावे.

ओडिशातील हिरापूर, ग्वाल्हेरजवळील मितवली,  खजुराहो आणि राणीपूर-झारियालमध्ये  प्रसिद्ध योगिनी मंदिरे आहेत.

स्थापत्य

देवता मूर्ती मधोमध ठेवून आपण त्याला परब्रह्माचे रूप मानतो. ते मंदिराचे ब्रह्मस्थान - ब्रह्मपद असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. मधोमध ब्रह्मस्थान - ब्रह्मपद ठेवून बाजूने वर्तुळ आखले जाते. वर्तुळ म्हणजे अनादी अनंताचे प्रतीक. कुठून सुरु होते आणि कुठे संपते समजत नाही! हे निसर्गातीलपुरूष’ तत्वाचे प्रतीक आहे. त्या भोवती बांधकाम करायचे तर भौमितिक, कोनीय रचना पाहिजे. त्यासाठी वास्तुपुरुष मंडलाचे यंत्र आखणे आवश्यक ठरले. ब्रह्मपद मधोमध ठेवून चार मुख्य दिशांचे बिंदू नोंदवले आणि त्यांना जोडणारे चौरस आखले तर मंडल तयार होते. सर्व बाजू समान असल्याने चौरसाला ज्ञान आणि बुद्धीच्या समतोलाचे प्रतीक मानले गेले. मुख्य आणि उप दिशांचे एकूण आठ बिंदू म्हणजे आठ चौरस होतात. मोठ्या आकाराची मंदिरे बांधण्यासाठी जास्त संख्येने कोन आखण्याची गरज पडते. इतर मंदिरांमधे या कोनांवर विविध देवदेवतांच्या मूर्ती असतात. शिखरावर उभ्या पट्ट्यांच्या रूपात हे कोन अगदी कळसापर्यंत जातात. पण चौसष्ट योगिनी मंदिरात या विविध कोनांमधून गोलाकार मंदिर उभारलेले दिसते. ( रेखाचित्र १)


 
वर्तुळाकार मंदिराच्या रचनेसाठी  चौसष्ट एककेंद्री चौरस आखले गेले मात्र वर शिखर बांधले नाही. प्रत्येक कोनात एकेक योगिनी प्रतिमा स्थापित केली आहे. हे मंदिर खुल्या आकाशाशी जोडलेले आहे कारण यातील योगिनी म्हणजे ऊर्जा! मधोमध शिव मंदिर म्हणजे पुरूष तत्त्व आणि सभोवती शक्तीची, ऊर्जेची विविध रूपे असलेल्या योगिनी! ऊर्जा - शक्ती - एनर्जी विविध रूपात सर्वत्र असते. ऊर्जा ही नेहमीच पवित्र, अविनाशी असते. अंतराळातील सूर्य हा ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. अवकाशस्थ ऊर्जेशी पृथ्वीवरील ऊर्जेचा संबंध स्पष्ट करणारी ही शक्ती मंदिरे बांधतांना कोणतेही छत किंवा शिखर बांधले जात नाही.

 उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या प्रांतांमधे आजवर एकूण तेरा चौसष्ट योगिनी मंदिरे आढळली आहेत. नेपाळमधे सापडलेल्या  मतोत्तर तंत्र ग्रंथात मूलचक्रामधे नऊ योगिनी असल्याचे  म्हंटले आहे. त्यामुळे नऊ मातांच्या गटांमधील प्रत्येकी नऊ योगिनींची संख्या गृहित धरल्यास ८१ योगिनी होतात. इथे तीच परंपरा अनुसरलेली दिसते.

 इथल्या प्रत्येक देवळीमधे असलेली योगिनी तिच्या स्वतंत्र लक्षणांसह दाखवली आहे. अत्यंत सुंदर, सुबक, घाटदार, आकर्षक आणि तारुण्याने ओतप्रोत अशा सर्व योगिनींसह भूत, प्रेत किंवा मांस खाणारे लांडगे, दाखवले आहेत. यापैकी कोणत्याही योगिनीजवळ रति क्रिडा दाखवणारी दृष्ये नाहीत. गूढ, रहस्यमय स्मित करणाऱ्या योगिनींचे  उठावदार दागिने, केशरचना पाहून त्या स्मशानवासी वाटत नाहीत आणि भीतीदायकही वाटत नाहीत.

 अभ्यासक, पर्यटक आणि भक्त मंडळींनाही कोड्यात टाकणारे, रहस्यमय तितकेच सुंदर असलेले भेडाघाटचे योगिनी मंदिर बघायलाच हवे. तंत्र मार्गाने मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी योग अनिवार्य आहे. आसन, प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी  या उपायांनी कुंडलिनी जागृत होऊन आपल्यातील परब्रम्ह तत्त्वाची अनुभूती येईल. आत्म्याला परमात्म्यामधे विलीन होता येईल. या श्रध्देतून लोक योगसाधना करत असत. योगिनींची आराधना करत असत. स्त्रियांनाही ज्ञानप्राप्ती आणि मोक्षाचा अधिकार देणाऱ्या धर्मात विश्व चालवणाऱ्या शक्तीला स्त्री रूपातच बघितले गेले. परकीय आक्रमणांच्या काळातील असहायतेतून योगमार्गापेक्षा वामाचार प्रबळ झाला आणि योगिनींची आराधना सर्वसामान्यांपासून दूर गेली. आपला धर्म, तत्त्वज्ञान समजावून घेऊन अशा मंदिरांना उर्जितावस्था आपण आणली पाहिजे.

कला आणि साहित्य

भवभूतीच्या आठव्या शतकातील 'मालतीमाधव' नाटकासारख्या काही जुन्या ग्रंथांच्या पानांमधून या योगिनी आपल्याला भेट देतात. या नाटकामध्ये कापालिक संप्रदायातील कपालकुंडला नावाची योगिनीची एक व्यक्तिरेखा आहे.सोमदेवाचे  'कथा सरितसागर' किंवा गुणाढ्याची   'बृहत्कथा'मध्ये यामध्ये योगिनी, त्यांची जीवनशैली, त्यांच्या श्रद्धा , उपासना यांचे अनेक उल्लेख आहेत. तत्कालीन राण्या देखील हे शाक्त विधी करत असल्याचे संदर्भ आपल्याला मिळतात.

उत्सव आणि परंपरा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत रामदास स्वामी यांनी शारदीय नवरात्री उत्सवातील देवीची विविध रूपे आपल्या एका अभंगात वर्णन केलेली आहेत . हीच  रचना महाराष्ट्रात नवरात्र उत्सव काळात देवीची आरती  म्हणून गायली जाते .

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळामाजी  श्रेष्ठ परशुरामाची जननी हो । कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकार गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।। उदो म्हणा उदो ।।

 

भयंकर असुरांचा पराभव करून देव थकले तेंव्हा त्यांनी आपल्या सामर्थ्या मधून स्त्री देवता निर्माण केली . प्रत्येक देवाने तिला आपले एक एक आयुध दिले . शुंभ , निशुंभ , रक्तबीज , महिषासुर अशा भयंकर असुरांचा वध देवीने केले. तिच्या पराक्रमाच्या कथा मार्कण्डेय पुराणाने सांगितल्या आहेत ज्या सप्तशती नावाने प्रसिद्ध आहेत . यातच रक्तबीज नावाच्या असुराच्या वधाची कथा आहे . या असुराला ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाला होता . त्याच्याअ रक्ताचा एक थेंब जरी  जमिनीवर पडला की त्यातून एक असुर निर्माण होत असे . त्यामुळेच  या असुराला मारण्यासाठी देवीला मदतीला धावून आल्या योगिनी ! ६४ योगिनी . काही ठिकाणी त्यांची संख्या ८२ मानली जाते पण रक्तबीज वधामध्ये प्रमुख सहाय्य करून पराक्रम केलेल्या या योगिनी म्हणजे योगशक्तीचे, पराक्रमाचे, सामर्थ्याचे प्रतीक मानल्या जातात .

मातृशक्तीचे एक रूप किंवा अवतार मानल्या गेलेल्या या योगिनी. तंत्रशास्त्रात यांची विशेष उपासना केली जाते . यांना गौण देवता असे मानले जाते तसेच योगाचा अभ्यास करीत असलेल्या , साधना करीत असलेल्या मानवी स्त्रीयांनाही योगिनी असे संबोधिले जाते.

तंत्रशास्त्रात यांचे रूप विचित्र किंवा भयंकर असे मानले जाते. आठ मातृकांच्या मधून यांची निर्मिती झाली असेही संदर्भ आढळतात . हठयोग प्रदीपिका , कुलार्णव तंत्र , अशा ग्रंथांमध्ये योगिनींचे उल्लेख सापडतात . योगिनी ही संकल्पना शाक्त,शैव, आणि वैष्णव संप्रदायांशी संबंधित आहे आणि नाथ संप्रदायाच्या साधनेतही यांना महत्वाचे  स्थान दिले गेले आहे .

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा।

वाराही चैन्द्रि चामुण्डा च महालक्ष्मीश्च ताः स्मृताः॥

एता मातृगणाः प्रोक्ता विश्वकर्मणि संस्थिताः।

सर्वे लोकहितार्थाय संहिता नित्ययोगिनः॥  महाभारत , वनपर्व २७२. ४४-४८

 

अग्नीपुराणाने या आठ मातृकांचे वर्णनही केलेले आपल्याला आढळते .

याच जोडीने सुर-सुंदरी, मनोहरा, कनकवती, कामेश्वरी, रति सुंदरी, पद्मिनी, नतिनी आणि मधुमती या  मुख्य ८ योगिनी दुर्गादेवीच्या मुख्य ८ शक्तींपासून उत्पन्न झाल्या आहेत ते मानले जाते . त्यांच्या प्रत्येकी ८ सहाय्यक शक्ती होत्या. या सर्व मिळून ८x ८=६४ ६४ योगिनी मानल्या जातात. काही ग्रंथानी या योगिनी  ८१ असल्याचेही मानले आहे. 

देवी उपासना आणि तंत्रशास्त्र यांच्याशी संबंधित एक ग्रंथ म्हणजे रुद्रयामल. यामध्ये  ८१ योगिनींची नावे दिली गेलेली आहेत ती  अशी-

अनाहता,आत्मिका,ज्येष्ठा,रौद्री,काली,कालिका,भद्रकाली,महाकाली,कल्याणी,भद्रा,रुद्राणी,कामाख्या,नारायणी,कौबेरि,वाराही,ऐन्द्रि,वैष्णवी,कौमारी,माहेश्वरी,चामुण्डा,ब्रह्माणी,त्रैलोक्यमोहिनी,वज्रेशी,भैरवी,दुर्गा,भीषणा,रक्तदंता,कालसंहर्षिणी,उग्रतारा,महातारा,नीलसरस्वती

मातङ्गी,भुवनेश्वरी,अन्नपूर्णा,त्रिपुरसुन्दरी,ललिता,सुन्दरी,कामाक्षी,तारा,धूमावती,बगलामुखी,बाला,भैरवी,छिन्नमस्ता,वज्रवैरोजिनी, सिद्धा,ज्वालामुखी,गुह्यकाली,रुद्राणी,मालिनी,कामेश्वरी

पूर्णेशी,मोहिनी,अघोरी,योगिनी,नागिनी,शंखिनी,पद्मिनी,बटुका,कंकाली,वेताली,पिशाची डाकिनी,शाकिनी,हाकिनी,राकिनी,लाकिनी,याकिनी,वाराही,भूचरी,दिक्चरी,अन्तरिक्षचरी

जलचरी,अग्निचरी,वायुचरी,नभश्चरी,आकाशचरी,खेचरी,पातालका,मन्त्रिणी,श्रीमहायोगिनी

यांच्या नावाववरुन आपल्याला लक्षात येते कि विविध पुरुष देवतांच्या शक्तीस्वरूप या योगिनी मानल्या जातात . पंचमहाभूतांशी असलेला यांचा संबंध त्यांच्या नावांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल.त्रिपुरसुन्दरी,ललिता यांची देवीरूपात पूजा केला जात असून त्यांची स्तोत्रे प्रसिद्ध पावलेली आहेत .  धूमावती,बगलामुखी या रूपातील आदिशक्तीची उपासना शारदीय नवरात्र काळात केली जाते. यातील काही देवता या रक्षक स्वरूपाच्या मानल्या गेलेल्या आहेत .

अलीकडील काळातील योगिनीचे उदाहरण पहायचे झाल्यास बंगालमधील प्रसिद्ध सत्पुरुष आणि स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांनी भैरवी ब्राह्मणीच्या  मार्गदर्शनाखाली साधना केल्याचे दिसून येते . ही एक योगिनी होती जिला तंत्रसाधना  आणि वैष्णव उपासना अवगत होत्या . इ.स १८६१ मध्ये श्रीरामकृष्ण यांनी तिच्याकडून तंत्रसाधनेतील ६४ उपासना शिकून घेतल्या .

काहीशा गूढ , विस्मयकारी पंरतु तरीही पूजनीय मानलया गेलेल्या योगिनी या नेहमीच सर्वांच्या औत्सुक्याचा विषय बनून राहिलेल्या आहेत .

वेधक आणि वेचक

 उपसंहार

शाक्त आणि शैव परंपरेतील, योगिनी, शाकिनी, डाकिनी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या देवता, आपल्या बहुपेडी, बहुरंगी  देवताविश्वाचा एक भाग आहेत. आपल्या पूर्वजांशी आपल्याला जोडणारे अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक धागे हे अशा अनेक समजुती आणि धारणांनीच विणले गेले आहेत.

 


Comments

Popular Posts