अमरेश्वर महादेव मंदिर, अंबरनाथ

परिचय




अंबरनाथ हे मुंबईच्या जवळचे , लाल, काळ्या मातीचे छोटे रस्ते आणि छोटी घरे असलेले, आणि मधून मधून डेरेदार झाडे आणि हिरवी पर्णराजीने सजलेले अगदी खास  कोकणी गाव-शहर आहे. यादव स्थापत्यकलेचा मैलाचा दगड असलेले अंबरनाथचे मंदिर इथेच वालधुनी नदीच्या काठावर वसलेले आहे.

साधारण अकराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले अंबरनाथचे मंदिर हे महादेवाचे रूप असलेल्या अमरनाथला समर्पित आहे.  सुरुवातीच्या 'यादव' काळातील मंदिरांपैकी एक असलेले हे बसाल्ट  पाषाणाचे मंदिर, शिलाहार राजा 'चेदराज' किंवा 'चित्तराज' आणि त्याचा भाऊ मनमणी यांच्या कारकीर्दीत बांधले गेले.

उंच 'शिखर' फारसे दृष्टीस पडत नसले तरी मंदिराची अलंकृत नक्षत्र प्रकारची रचना देखणी आणि भव्य आहे. दख्खनच्या स्थानिक  काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराच्या भिंती आणि भिंतींच्या पायथ्याचे 'थर', कुशल शिल्पकलेचे द्योतक आहेत. अंबरनाथ चे हे मंदिर भूमिज शैलीच्या मंदिर स्थापत्यकलेचे एक देखणे उदाहरण आहे .

अंबरनाथ गाव अरबी समुद्राच्या जवळ आहे. जवळच असलेली , शूर्पारक म्हणजे सध्याचे नाला सोपारा आणि श्रीस्थानक म्हणजे आताचे ठाणे तसेच कल्याणक (कल्याण) ही सातवाहन काळातील बंदर-शहरे आणि प्रशासकीय केंद्रे होती. तसेच अंबरनाथला कान्हेरी, घारापुरी, मंडपेश्वर अशा लेणी-मंदिरांनीही वेढले आहे.



इतिहास

अंबरनाथ मंदिरात सापडलेल्या शिलालेखात 'अमरनाथ देवकुल'चा उल्लेख आहे. हा शिलालेख इ.स. १०६० चा असून तो मनमानी राजाच्या राज्यकाळातील आहे. त्यात आणखी एक शिलाहार राजा चित्तराज याचा उल्लेख करून 'चित्तराजदेवस्व्य भवनम्' असा उल्लेख आहे, त्यामुळे मंदिराचे  बांधकाम चित्तराजाच्या काळात सुरू झाले असे सूचित होते. या शिलालेखात 'पाटपल्ली' नावाच्या ठिकाणाचाही उल्लेख आहे. मंदिराच्या दक्षिणेस असलेलया पाळे गावाचा हा पुरातन  उल्लेख असू शकतो.

मात्र त्यानंतर प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथांत या मंदिराचे इतर संदर्भ क्वचितच आढळतात. अंबरनाथ मंदिराचे पुढील संदर्भ १९ व्या शतकातील पुरातत्त्वीय अहवालातील आहेत. १८५० मध्ये ब्रिटिश सर्वेक्षण पथकांनी या मंदिराचा शोध लावला. त्यानंतर त्याचे जतन करून तेथे पूज-अर्चा सुरु झाली.   वैभवशाली स्थापत्य असलेल्या , ब्रिटिश राजवटीत सापडलेल्या  आणि नोंदवलेलया,  सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे अमरेश्वर महादेव. त्याचप्रमाणे तज्ज्ञांनी नोंदवलेल्या सर्वात जुन्या भूमिज मंदिरांमध्ये हि या मंदिराचा समावेश होतो.

मंदिरातील गर्भगृहामध्ये, जवळजवळ ३ मीटर जमिनीखाली उतरून "स्वयंभू" अशा , काळ्या पाषाणातील शिवलिंगापर्यंत आपल्याला पोहोचता येते . मंदिराच्या भिंती आणि प्रवेशद्वारावरील शिल्पांवर नाथसिद्ध आणि शैव परंपरेचा मोठा प्रभाव दिसून येतो.

स्थापत्य

मंदिर उभारणीचा काळ निश्चित करण्यासाठी शिलालेखाचा उपयोग होतो. शिलालेखात मंदिर कधी, कुणी उभारले याची माहिती नोंदवलेली असते. असा उल्लेख असलेले भारतातील पहिले भूमिज शैलीचे मंदिर इ.स. १०६० मध्ये उभारलेले अमरनाथ किंवा अंबरनाथ हे ठाणे जिल्ह्यातील शिवमंदिर! शिलाहार राजघराण्याचा शासक मामवाणीराज किंवा मुम्मुणी याने हे मंदिर बांधून पूर्ण केले. शिलालेखात त्याचा काळ शके ९८२ असा दिला आहे. म्हणजेच इ.स. १०६० मध्ये हे मंदिर उभारले गेले. भूमिज शैलीचे हे पहिले मंदिर आहे.



अंबरनाथचे शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याचा तलविन्यास-प्लॅन ताऱ्याच्या आकाराचा आहे. पत्त्यातला चौकट हा आकार आपल्याला ठाऊक आहे.असा छोटी चौकट म्हणजे गाभारा, तर त्याच्या पुढे टोकाला टोक जोडून दुसरी चौकट म्हणजे सभामंडप अशी मूळ रचना आहे. बाहेरून तळापासूनच लहान कोनांची रचना शिखरापर्यंत चढत जाताना अनेक प्रकारच्या मूर्तीसाठी जागा झाली. काही ठिकाणी उजेड तर आतल्या भागावर सावली येते. त्यामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीवर छाया-प्रकाशाचा मनोहारी खेळ नेहमीच दिसतो.

जोत्यावर एकेका स्तरात नक्षीकाम केलेले दिसते. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आणि प्रत्येक दारासमोर एक छोटा मुखमंडप आहे. 'जोतं' म्हणजेच ओटा. मंदिरस्थापत्याच्या भाषेत म्हणायचे अधिष्ठान. बंगल्याच्या किंवा एखाद्या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी पोर्च असतो. त्यालाच इथे मुखमंडप म्हणतात. तीनही प्रवेशद्वारांवर गजानन कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला नक्षीच्या चौकटी क्रमाने कोरलेल्या दिसतात. त्यांना द्वारशाखा म्हणतात. द्वारशाखांच्या मधोमध आपल्या डोक्यावर येणाऱ्या स्थानावर एखाद्या देवाची छोटीशी प्रतिमा कोरलेली दिसते. या स्थानाला 'द्वार ललाटबिंब’  म्हणतात. या तीनही मुखमंडपाचे छत सपाट म्हणजेच 'समतल' आहे. आतल्या चारही बाजूंना खांबांच्या दोन रांगा दिसतात. चार प्रमुख खांबांनी छत तोलले आहे. मधल्या गोलाकार छताची रचना एककेंद्री वर्तुळाची मालिका असल्याप्रमाणे दिसते. एकाच बिंदूभोवती मोठी होत जाणारी वर्तुळे काढली तर कसे दिसेल? तशीच रचना इथे छताची दिसते. या प्रकाराला 'सभापद्म' प्रकारचे छत म्हणतात. या गोलाकार रचलेल्या दगडांना फुलाचा आकार दिला आहे. म्हणून त्याला 'सभापद्म' म्हणायचे.

इथे मंडप बंदिस्त असल्यामुळे त्याला 'गूढमंडप' म्हणायचं. गूढमंडपातून पुढे गेल्यावर अंतराळ येते. येथे दोन्ही बाजूंना भिंतींत दोन देवळ्या दिसतात. भिंतीवर खांब व कमानीने अशा सजलेल्या कोनाड्यांत मूर्ती कोरलेल्या दिसतात. त्या कोनाड्यांना ‘देवकोष्ठ‘ म्हणतात. मंडप आणि गाभारा यांच्यामधला भाग म्हणजे अंतराळ, अंबरनाथच्या अंतराळातील भिंतीवर देवकोष्ठ असले तरी मूर्ती नाहीत. अंतराळाचे छत सपाट आहे. नक्षीदार द्वारशाखांनी गाभाऱ्याचे दार सजलेय. द्वारललाटबिंब म्हणून इथेही गणेशच दिसतो. त्याच्याही वर असणारा भाग म्हणजे 'उत्तररांग'. इथे उत्तरांगावर शिव आणि इतर देव-देवता कोरलेल्या दिसतात. उंबरठ्याला म्हणायचं 'मंदारक'. गाभाऱ्याच्या मंदारकावर कीर्तिमुख कोरले आहे. मंदारकासमोर अर्धचंद्रासारखी पायरी असल्यामुळे त्याला अर्धचंद्रशिला म्हणायचे. गाभारा अगदी साधा आहे. कोणतेही नक्षीकाम गाभाऱ्याच्या भिंतीवर दिसत नाही. काही पायऱ्या उतरून गेल्यावर जमिनीतील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते.

अंबरनाथचे शिवलिंग तिथल्याच जमिनीतून वर आल्यामुळे ते स्वयंभू आहे. ज्याच्यावर शिवाचे चेहरे कोरलेले असतात. त्याला 'मुखलिंग', तर उभ्या रेषा कोरलेल्या असतात. त्याला 'धारालिंग' म्हणायचं. इथे खाली उतरून शिवलिंगाचे दर्शन घेता येते म्हणून याला म्हणतात ‘पाताललिंग’.

बाहेरच्या बाजूने पाहिले तर मंदिर किती योजनापूर्वक कोरलंय हे कळतं. जोत्यावर एकेका थरात नक्षीकाम केलंय. आज शिखर भग्नावस्थेत आहे. तरीही पूर्वी ते किती उत्तुंग आणि नक्षीदार असेल याची सहज कल्पना येते. मंडपावरच्या शिखराचा आकार पिरॅमिडप्रमाणे कोनासारखा आहे. याला 'संवरण' असं म्हणतात.

अंबरनाथच्या मंदिराची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे त्याचा ताऱ्याच्या आकाराचा प्लॅन. या प्रकारचा प्लॅन नंतरच्या काळात महाराष्ट्रातील भूमिज मंदिरांचे वैशिष्ट्यच बनले. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचा प्लॅनही असाच आहे. अशा रचनेमुळे गाभारा अगदी लहान आणि मंडप चांगला मोकळा, मोठा बनतो. तीन प्रवेशद्वारे करणेही सोपे होते.

दुसरें वैशिष्ट्य म्हणजे शिखर. कोरीव नक्षीकामाने नटलेल्या शिखराच्या चार कोनांकडे बघा. तिथे खांबाप्रमाणे कोरीव काम केले आहे. दुरून बघितल्यावर ते खांबच वाटतात. महाराष्ट्रात नंतरच्या काळातील मंदिरांमध्ये या खांबांना अधिक नक्षीदार सुंदर केले गेले. यांच्या सरळसोट स्वरूपाऐवजी मुख्य शिखरांच्या प्रतिकृती एकावर एक कोरल्या गेल्या. चारही कोपऱ्यांवर अशी सुंदर छोट्या छोट्या शिखरांची माळ दिसू लागली. नंतरच्या काळात सिन्नर, सातगाव, बलसाणे अशा अनेक ठिकाणच्या मंदिरांवर असेच शिखर कोरले गेले.

अंबरनाथच्या मंदिरावर बाहेरून सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. यात महाकाली, ब्रह्मदेव, विष्णू, दुर्गा, गणपती, गजासूरवध शिव अशा विविध मूर्ती आहेत. छोटे खांब असलेल्या देवकोष्ठांमध्ये या सर्व मूर्ती बसवलेल्या आहेत.

जमीनीपासून शिखरापर्यंत जाणाऱ्या उभ्या पट्ट्यांची रचना असलेले शिखर आज भग्नावस्थेत आहे. त्यावर घोड्याच्या नालाप्रमाणे अर्धवर्तुळाकार नक्षी कोरलेली आहे. शिखराच्या पुढे हत्तीच्या पाठीप्रमाणे दिसणारा छताचा भाग आहे. याला 'महानासिका' किंवा 'शुक नास' म्हणतात. शुकनासावर उत्तर आणि दक्षिण बाजूला देवळ्यांमध्ये काही मूर्ती कोरलेल्या आहेत.

अंबरनाथच्या शिखर आणि तलविन्यास या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा प्रभाव पुढील बऱ्याच भूमिज मंदिरांवर पडलेला दिसतो. दोन शंकरपाळी - डायमंड आकाराचे चौकोन, टोकाला टोक जोडून समोरासमोर ठेवल्याप्रमाणे दिसणारा आराखडा हे एक वैशिष्ट्य; तर दुसरे म्हणजे शिखरावर उभे नक्षीदार पट्टे कोरल्यामुळे भव्यतेचा, उंचीचा आभास अधिकच गडद होतो. पुढच्या काळात या खांबांच्या जागी शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती कोरल्या जाऊ लागल्या. त्यावरुनच या स्थापत्य शैलीला भूमिज असं नाव मिळाले.



कला आणि साहित्य

महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस मनाला जातो आणि काशी येथील विश्वनाथ मंदिरात हा सोहळा उत्साहाने साजरा केला जातो .

शिव महापुराणातील शिव पार्वती विवाह-

तत् श्रुत्वा वचनं तेषां सुहृदां  स हिमालय :|स्वकन्यादानं अकरोत् शिवाय विधिनोदित :|| ३७
इमां कन्यां तुभ्यमहं ददामि परमेश्वरभार्यार्थे परिगृहीष्व प्रसीद सकलेश्वर || ३८
वेदमन्त्रेण गिरिशो  गिरिजाकर पङ्कजं |अग्राह  स्वकरेणाशु  प्रसन्न : परमेश्वर :|| ४१

ब्र्हमाजी म्हणाले-

हिमालयाने आपल्या मित्र पर्वतांचे म्हणणे ऐकून आपल्या लेकीचे विधीपूर्वक कन्यादान केले . माझी ही कन्या हे परमेश्वर शंकरा , तुम्हाला आम्ही देत आहे . पत्नी म्हणून तुम्ही तिचा स्वीकार करा असे हिमालयाने म्हटले आणि वेदमंत्रांच्या घोषात पार्वतीचे करकमल शिवाने आपल्या हातात घेऊन तिचे पाणिग्रहण केले .

 शिव पुराण आपल्याला शिव पार्वती विवाहाचे सविस्तर वर्णन सांगते , ते मुळातून वाचणे  रंजक आहे . पार्वतीने शिवप्राप्तीसाठी केलेली तपश्चर्या , शिवाने तिची घेतलेली परीक्षा , शिव आणि पार्वती यांचा अलौकिक संवाद , हिमालयाने आणि त्याची पत्नी मैना यांनी केलेली विवाहाची तयारी , विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेचे पूजन, शिवाला पत्रिका पाठविली जाणे , शिवाने आपल्या गणांसह वरातीने हिमालयाच्या नगरीत पोहोचणे असे सारे वर्णन वाचल्यावर आपल्याला एखाद्या मानवी विवाहाची आठवण येईल . परंतु हा विवाह साक्षात पुरुष आणि प्रकृतीचा आहे, त्यामुळे तो देदीपयमान सोहळा आहे .

 वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥

 महाकवी कालिदासाने कुमारसंभव या काव्याच्या सुरुवातीला शिव आणि पार्वती यांना या सृष्टीचे माता-पिता म्ह्णून संबोधिले आहे त्यावरून त्यांच्या विवाहाचे महत्व लक्षात यावे .

उत्सव आणि परंपरा

 महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवाच्या आराधनेचा विशेष दिवस मनाला जातो .भारतातील सर्व शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्री हा दिवस श्रद्धेने , उत्साहाने साजरा केला जातो . शुभ्र वस्त्रे परिधान करून, दिवसभर उपवास करून भाविक शिवाच्या मंदिरात दर्शनाला जातात . शंकराला पांढरी फुले, बेलाची पाने वाहिली जातात . रुद्राभिषेक केला जातो . शिवमंदिरात आणि परिसरात संध्याकाळी मंगल दीप लावले जातात . बम बम बोले च्या घोषात शिवांची  पालखी निघते , आरती केली जाते .



 रात्रभर शिकारीची वाट पहात झाडावर बसलेला शिकारी आणि त्याला झालेला बोध ही कथा सर्वश्रुत आहेच .

एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचासांभाळ करीत असे . एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला शेवटचे  भेटून येतो. त्यानंतर तू मला मारू शकतोस . त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- "मला मार पण  माझया कुटुंबातील  इतरांना  सोडून दे." त्यांचे हे परस्परांचे प्रेम पाहून त्याला  पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि आपल्या कुटुंबाची आठवण आली .  त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे त्याने आपल्या जीवनाची दिशा बदलली . या कथेवरून प्रेरणा घेऊन  महाशिवरात्रीनिमित्त  उपवास केला जातो.

 फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष या तिथीला महाशिवरात्री संपन्न होते , खरंतर  प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते पण फाल्गुन महिन्यातील या दिवसाचे महत्व शैव संप्रदायात विशेष आदराचे स्थान मिळवून आहे .

उत्तराखंड येथील त्रिजूगी  नारायण मंदिरात शिव पार्वती विवाह झाला अशी धारणा आहे . यावेळी प्रज्वलित केलेला अग्नी आजही अव्याहत  तिथे सुरु आहे अशी श्रद्धा आहे .

 रंगभरी एकादशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या आधी , शिव आपल्या नवपरिणीत पत्नीला म्हणजे पार्वतीला घेऊन प्रथमच काशी येथे आले असे मानले जाते . या निमित्ताने कशी विश्वेश्वर मंदिरात गुलाल उधळून भाविक आनंद साजरा करतात .

 महाशिवरात्री ही आध्यात्मिक दृष्टीने शैव संप्रदायात आत्मचिंतानासाठी प्रसिद्ध आहे . शिव पार्वती विवाहाचा संदर्भ या दिवसाला असल्याने गृहस्थ  आणि गृहिणी वैवाहिक सुख- समाधनासाठी  या दिवशी पूजा करतात. अंबरनाथ येथील शिव मंदिरात या दिवशी यात्रा भरते आणि विशेष पूजेचे आयोजन केले जाते .

 शिवा भूत्वा शिवां यजेत् | म्हणजेच आपण शिव म्हणजे कल्याणकारी व्हावे आणि शिवाचे यजन करावे आणि हे साध्य करण्यासाठी शिव मंदिराला भेट द्यावी . .



 वेधक आणि वेचक

मंदिराच्या भिंतीवर,  सूत्रधार किंवा मास्टर आर्किटेक्ट याचे चित्रण केले आहे.

उपसंहार

अंबरनाथ मंदिर, अनेक अर्थांनी अद्वितीय आणि 'पहिले' मंदिर असलेले हे देऊळ म्हणजे भूमिज शैलीचे रत्नच आहे. मध्ययुगामध्ये  खंडित झालेली मंदिराची परंपरा आता उत्सव, दैनंदिन प्रार्थना आणि पूजा याद्वारे अखंडपणे सुरू राहिली आहे, हे सनातन मूल्यांच्या अखंड प्रवाही स्वभावाचे द्योतकच आहे

 


Comments