मीनाक्षी मंदिर, मदुराई

 

परिचय



मीनाक्षी अम्मन, म्हणजे माता मीनाक्षी ही मदुराईची जणू राज्यकर्ती अशी देवी हे. वैगई नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराचा भव्य विस्तार आणि प्रसिद्धी  उभ्या भारतामध्ये अतुलनीय आहे.

येथे मीनाक्षी म्हणजे महादेवाची चिरंतन पत्नी उमाचे प्रकटीकरण आहे. मीनाक्षी, नावाप्रमाणेच, माशाच्या आकाराशी स्पर्धा करणारे जिचे डोळे आहेत, अशी राजा मलयध्वज आणि राणी कांचनमाला यांची सुंदर कन्यका.   या राजकन्येने कैलास पर्वतावर चढाई करून विजय मिळवला आणि शिवाचे रूप असलेल्या सुन्दरेश्वराशी विवाह केला. पौराणिक कथेनुसार, त्या दोघांनीही मदुराई येथील मंदिरात मीनाक्षी आणि सुंदरेश, म्हणजेच शक्ती आणि शिव या नावाने कायमचा निवास केला अशी धारणा आहे. 

साधारण पंधरा एकरांवर पसरलेल्या या मंदिर संकुलात चौदा गोपुरे  किंवा प्रवेशद्वारे, मीनाक्षी आणि सुंदरेश यांची स्वतंत्र भव्य मंदिरे, तलाव आणि उत्कृष्ट शिल्पे आणि खांबांनी सजलेली अनेक दालने आहेत.

तामिळनाडूतील मदुराई ही प्राचीन पांड्य घराण्याची राजधानी आहे तामिळ संस्कृतीचे मध्यवर्ती केंद्र. मदुराईचे माहात्म्य फक्त मंदिरामुळे नाही तर पांड्य राजांच्या बलिष्ठ राज्यसत्तेचे ही हे  नगर द्योतक आहे. मदुराई गेल्या अनेक शतकांपासून आपल्या कापड , रेशीम आणि धातूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.




इतिहास

मदुराई शहर आणि मीनाक्षीचे मंदिर या दोन्ही शहरांचे मूळ प्राचीन आहे, किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे आहे.

कदंब वृक्षांच्या वनात वैगई नदीकाठी इ.स. ११९० ते १२०५ दरम्यान मीनाक्षी मंदिर बांधले गेले. हे बांधणारा सदयवर्मा कुलशेखर हा पाण्ड्य घराण्याचा राजा मोठा कलाप्रेमी होता. संगम साहित्यात उत्तम कवी, संतवृत्तीचा राजा म्हणून त्याचे कौतुक केले आहे. सदयवर्मा कुलशेखर याची काव्यरचना ‘ अंबिकै मलै ‘ उपलब्ध आहे. विस्तृत जमीनीवर सदयवर्मा कुलशेखर याने आटोपशीर असे मीनाक्षी मंदिर आणि जलकुंड बांधले. या सतरा एकर परिसरावर पुढच्या काळात वेगवेगळ्या राजांनी इतर मंदिरे आणि गोपुरे बांधली. इस्लामी आक्रमक मलिक काफूर याने १४व्या शतकात दख्खनच्या एका आक्रमणादरम्यान मीनाक्षी मंदिरावर हल्ला केला. काही भागाची तोडफोडही केली, हे देवालय लुटले आणि नष्ट केले . मात्र त्याला हरवून विजयनगरच्या राजांनी आणि नायक घराण्याच्या राजांनी  १६व्या शतकात हा सर्व परिसर पुन्हा विकसित केला, या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि त्यात अनेक वास्तूंची भरही घातली.

स्थापत्य

पाण्ड्य घराण्याने जगभर खूप मोठ्या प्रमाणात व्यापार करून आपले राज्य वैभव शिखरावर नेले. विविध कलांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी प्रोत्साहन दिले. आपण नेहमीच ‘संगम साहित्य’ हे नाव वाचतो. संगम म्हणजे संमेलन. पाण्ड्य राजांनी तमिळ साहित्यकारांची संमेलने भरवली. त्यामधे लेखक आपल्या लेखनाचा परिचय सर्वांना करून देत आणि त्यावर विद्वानांची चर्चा होत असे. यातून तयार केलेल्या सुधारित आवृत्तीला साहित्यकृतीचा मान दिला जाई. हे सर्व संगम साहित्य आपल्याला भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी आज उपयोगी पडते आहे.

अशा या दूरदर्शी कुशल शासकांनी अत्यंत सुंदर मंदिरे उभारली. समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक घडामोडींचे ठिकाण म्हणून मंदिरांचा विकास केला. इसवीसनाच्या सुमारे आठव्या नवव्या शतकापासून भारतात मंदिरे ही केवळ देवालये न राहता समाज व्यवस्थेचा आधार बनली. पाण्ड्य घराण्याने बांधलेली अनेक मंदिरे याचे उत्तम उदाहरण ठरतात. जसे, कुंभकोणम्, तिरू अन्नामलै, त्रिची, कालुगुमलै, तिरुवेल्लरै, तिरूमलापुरम्, कुन्नाकुडी, नलैअप्पा मंदिर तिरूनेलवेल्ली अशी कितीतरी नावे सांगता येतील. वेरूळच्या कैलास लेण्याप्रमाणेच एका पाषाणातून कोरलेले तुथुकुडी येथील वेट्टुवन कोविल हे पाण्ड्य राजांनी घडवले आहे.

पाण्ड्य कालीन मंदिर स्थापत्याची ठळक वैशिष्ट्ये -

अतिभव्य मंदिरे बाधून पाण्ड्य राजांनी ‘ मंदिर ग्राम ‘ म्हणजेच टेम्पल टाऊन ही संकल्पना विकसित करण्यात हातभार लावला. त्यांच्या समकालीन चोल, चेर व इतरही राजांनी हे कार्य केले आहे त्यावरून प्राचीन भारतीय राजांमधे असलेला समान सांस्कृतिक विचार स्पष्ट होतो. पाण्ड्यांच्या काळी मंदिरांमधे विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र मंडप उभारलेले आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी नृत्य मंडप

, अन्नप्रसादनिर्मितीसाठी भोग मंडप, पाठशाळा, यज्ञशाळा, नामकरण - उपनयन - विवाहादी संस्कारांसाठी कल्याण मंडप त्यांच्या मंदिरात दिसतात. या मंदिर ग्रामाचा शासक आणि सृष्टीचा अधिपती असलेल्या देवाचा प्रासाद - महाल ही संकल्पना  असल्याने या मंदिरांची रचना अतिभव्य स्वरूपाची आहे. एखाद्या राजाचे दैनंदिन जीवनातही वैभवशाली सोहळे होतात तसेच इथल्या देवाचे होतात. त्यांच्यासाठी सुरेख नक्षीदार पालख्या, रथही असतात.

चोला घराण्याच्या राजांनी बांधलेल्या मंदिरांची गोपुरे कोरीव नक्षीकामाने नटलेली पण मुख्य मंदिराच्या शिखरापेक्षा कमी उंचीची आहेत. पाण्ड्य राजांनी मात्र भरपूर मूर्ती, शिल्पे व नक्षीकामाने नटलेली खूप उंचीची, अगदी शिखरापेक्षाही जास्त उंच असलेली गोपुरे बांधली. प्रवेशद्वारावरच्या या उंच गोपुराचा इमारतीसारखा उपयोग पाण्ड्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. द्रविड मंदिर स्थापत्यात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. बरीचशी पाण्ड्यकालीन मंदिरे छोटी, आटोपशीर असण्याचे मुख्य कारण म्हणजे मूळ मंदिराचे प्राचीनत्व! गाभारा, त्यावरचे शिखर आणि समोरचा सभामंडप हे मुख्य मंदिर बरेच प्राचीन असेल तर त्याचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. मग मूळ मंदिराची दुरूस्ती करून इतर भव्य बांधकाम गोपुरांच्या रुपात करणे पाण्ड्य शासकांना योग्य वाटले. मीनाक्षी मंदिरही याला अपवाद नाही. मूळ मंदिर छोटेखानी आहे पण भोवतीचे विविध मंडप, कुण्ड, तटबंदी आणि गोपुर अतिभव्य स्वरूपाचे आहेत. मीनाक्षी मंदिराला एकूण चौदा गोपुरे आहेत.

मदुराई हे मंदिरग्राम ‘नंद्यावर्त’ प्रकारच्या नगर रचनेनुसार तयार केले आहे. वास्तुशास्त्रातील नगर रचना प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स आणि त्यांचे उपयोग दिले आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे ‘ नंद्यावर्त’. या नंद्यावर्त प्लॅन - आराखड्यानुसार गावाच्या मधोमध चौरस आकाराचे मंदिर बांधावे आणि सामाजिक एकत्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्या ठिकाणापासून चार मुख्य व चार उपदिशांना जाणारे मोठे रस्ते तयार करावे. त्यांना जोडणारे छोटे रस्ते शिस्तशीरपणे घरांपर्यंत जाणारे असावेत. अशा गावाचा आकार चौरस किंवा गोलही असू शकतो. ग्राम देवता आणि गावाचे आराध्य दैवत गावाच्या मधोमध असावे. अशा रचनेमुळे गावातून वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे सहज शक्य होते आणि कार्यक्षमता वाढते. नंद्यावर्त नगर रचनेची माहिती देताना असे मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते. साहित्य संस्कृती आणि व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या मदुराई नगरीची रचना करण्यासाठी पाण्ड्य राजा सदयवर्मा कुलशेखर याने अभ्यासू, कुशल स्थपतीची नेमणूक केली असणार हे लक्षात येते.

शैव, वैष्णव आणि शाक्त संप्रदायांना एकत्र आणणारे मीनाक्षी मंदिर पंधरा एकरावर बांधले आहे. इथे शिवासाठी सुंदरेश्वर आणि पार्वतीसाठी मीनाक्षी ही नावे प्रचलित आहेत. सुंदरेश्वर मंदिराचे गोपुर सर्वात प्राचीन म्हणजे सदयवर्मा कुलशेखर याने बांधलेले आहे. मारवर्मा सुंदर  या पाण्ड्य राजाने चित्र गोपुर बांधले. याच्यावरचे नक्षीकाम अद्वितीय आहे. काडका गोपुर हे मीनाक्षी मंदिराचे पाच मजली प्रवेशद्वार तुम्पिची नायक राजाने सोळाव्या शतकात बांधले. मलिक काफूरच्या हल्ल्यात मूळ गोपूर खंडित झाले होते.

मीनाक्षी आणि सुंदरेश्वर मंदिरांच्या मधल्या जागेत नंतरच्या काळात गणेश मंदिर बांधले गेले. त्याच्या गोपुरांना नडुकट्टु, इडैकट्टु म्हणतात. नायक घराण्याच्या विश्वप्पा नायक याने इ.स. १५३० मधे बांधलेले नायक गोपुर हे इथल्या पलहै गोपुरासारखेच आहे. मोत्तै गोपुराला ३०० वर्षे शिखरच नव्हते. विजयनगर आणि नायक घराण्याच्या राजांनी ते काम पूर्ण केले. मराठा साम्राज्याच्या काळात त्यावर चुना, विटा, माती यांचा वापर करून स्टको पद्धतीने मूर्तीकाम केले गेले.


या सर्व गोपुरांमधे आतून वर जाण्यासाठी जिने आहेत. वर मोठमोठी दालने आहेत. त्यांचा वापर पूर्वी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कामांसाठी होत असे.

शेकडो खांबांचे बरेच मंडप या मंदिरात आहेत. अयीरक्काल या शब्दाचा अर्थ आहे सहस्रखांबी! भिंतीत लपलेले स्तंभ वगळता आपल्याला ९८५ खांब या मंडपात दिसतात. अरीयनाथ मुदलीयार यांनी बांधलेल्या या मंडपातील शिल्पकाम भारदस्त आहे. प्रत्येक खांबावर उसळणारे व्याल कोरलेले आहेत. किलीकुण्डु म्हणजे पोपटांचा मंडप. महाभारताच्या कथा सांगणारी अप्रतिम शिल्पे इथे आहेत. या मंडपात पूर्वी शेकडो पोपट पाळलेले होते. त्यांना ‘मीनाक्षी’ म्हणायला शिकवले जाई. अष्टशक्ती मंडपात आठ देवींच्या मूर्ती आहेत. दोन पाण्ड्य राण्यांनी हा मंडप उभारला. मीनाक्षी मंदिर आणि मुख्य गोपुराच्या मधे हा मंडप आहे. शंभर स्तंभ आणि नटराज मूर्तीची स्थापना केलेला नायक मंडप चिन्नप्पा नायक यांनी बांधल्याचा संदर्भ सापडतो. असे बरेच मंडप आणि पोर्थमलैकुरम् - सुवर्ण कमळांचे तळे - नावाचे तळे इथे आहे. या तळ्यात मधोमध कमळ बांधलेले आहे.

द्रविड शैलीच्या स्थापत्याचा अलौकिक, अप्रतिम आविष्कार मदुराईला साकारला आहे. किमान हजार वर्षे पूजा होत असलेल्या या मंदिराने प्राचीन भारतीय शिल्प, साहित्य, कला, स्थापत्य, गणित, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातील प्रगतीचा वस्तुपाठच आपल्या समोर ठेवला आहे.

 

कला आणि साहित्य

मीनाक्षी म्हणजे देवी पार्वती आणि सोम सुन्दरेश्वर म्हणजे भगवान शिव ! हालास्य  माहात्म्य या संस्कृत ग्रंथात भगवान शिवाच्या लीलांचे वर्णन आढळते ; विशेषतः  मदुराईस्थित शिवाच्या लीलांचे हे वर्णन . मूळ तमिळ भाषेतील पुराण तिरुविलायदल याचा हा संस्कृत अनुवाद आहे . या लीला  भगवान सुब्रह्मण्यम याने अगस्त्य ऋषींना  सांगितल्या आणि त्यांनी त्या इतरांना कथन केल्या.  सोम सुन्दरेश्वराने  मदुराई हे आपले निवासस्थान का आणि  कसे निवडले याची कथा आपल्याला हा ग्रंथ सांगतो . पेरुंपरपुरियूर नाम्बी  यांनी लिहिलेले हे पुराण !

 उत्सव आणि परंपरा

मीनाक्षी देवी आणि सुन्दरेश्वर यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने मदुराई येथील मंदिरात साजरा केला जातो . जगभरातून भाविक , पर्यटक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतात .

शिव शक्तीची ही मेळणी  म्हणजे साधारण विवाह नाही तर तो एक अलौकिक असा सोहळा आहे . शिव आणि शक्तीला महाकवी कालिदासानेही जगताचे पालक असं म्हणून त्यांचा यथोचित गौरव केलेला आहे .

वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।

 जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ।।

 मदुराई-नावातच माधुर्य म्हणजे गोडवा असणारे हे धार्मिक क्षेत्र ! भगवान शिवांच्या  अलौकिक स्पर्शाने पुनीत झालेले हे ठिकाण आणि मीनाक्षी देवीची अलौकिक जन्मकथा !

देवतांच्या जन्मकथा त्यांच्यासारख्याच अलौकिक ! मीनाक्षी ही पांड्य  राजा मलयध्वज पांड्यन आणि राणी कांचना मलाई यांची मुलगी होती. या शाही दाम्पत्याला दीर्घकाळ अपत्य सुखापासून वंचित रहावे लागले.  अपत्य प्राप्तीसाठी  मलयध्वज राजाने विशेष पूजा केली आणि प्रार्थना केली. यज्ञादरम्यान एक ३ वर्षांची मुलगी अग्नीतून बाहेर पडली जिला तीन स्तन होते .  त्यावेळी आकाशातून एक दिव्य वाणी झाली  की ही कन्या  शिवपत्नी पार्वतीचा  अवतार आहे आणि  ती उपवर झाली की शिव स्वतः तिचे पाणिग्रहण करण्यासाठी येतील.  मीनाक्षी दिसमासाने वाढू लागली.

मीनाक्षीला युद्धाचे प्रशिक्षण देण्यात आले होते आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिला पांड्य राज्याची राणी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. तिने तिच्या युद्ध कौशल्याने संपूर्ण जग जिंकले आणि तिने शिवाचे निवासस्थान जिंकण्यासाठी कैलास पर्वतावर आक्रमण केले . जेव्हा मीनाक्षीचा सामना युद्धभूमीवर शिवाशी झाला तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिला जाणवले की ती पार्वतीचे एक रूप आहे. प्रत्यक्ष शिवांना भेटल्यावर भेटल्यावर तिचे तिसरे स्तन आपोआप गळून  पडले.  भगवान शिवाने मीनाक्षीला आश्वासन दिले की तो तिच्याशी विवाह करण्यासाठी मदुराईला येईल आणि तिथे त्यांचा दिव्य विवाहसोहळा संपन्न होईल. . वचन दिल्याप्रमाणे, शिव, सर्व देवता आणि ऋषी यांचयाशी  मदुराईला आले. सुंदरेश्वराच्या रूपात शिवाने मीनाक्षीशी लग्न केले आणि सुंदर पांड्यन या नावाने पांड्य राज्यावर राज्य केले. तेंव्हापासून शिवाचे मंदिर मदुराईत असून तो सोम सुन्दरेश्वर नावाने ओळखला जातो .

ही कथा जशीच्या तशी आपल्याला  अनुभवायची असेल तर चिथिराई उत्सवात सहभागी व्हायला हवे . मंदिरात  पवित्र असे ध्वजारोहण करून या एक महिना होणाऱ्या उत्सवाचा प्रारंभ होतो . शिव आणि वैष्णव संप्रदायाचा मिलाफ म्हणूनही या उत्सवाकडे पाहता येईल. मीनाक्षीच्या बंधूंचा म्हणजे भगवान विष्णूचा या विवाहामधील  सहभाग हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जाते . मीनाक्षीचा पट्टभिषेक  सोहळा साजरा केला जातो . मंदिरातील पुरोहिताच्या कुमारवयीन मुलाला मीनाक्षीचा वेष दिला जातो . हा पवित्र वेष धारण करून देवीसारखी वेशभूषा , केशभूषा करून देवीस्वरूप हा कुमार देवीच्या रथावर बसतो आणि मिरवणुकीत सहभागी होतो . ही यात्रा पाहण्यासाठी
भाविक गर्दी करतात .

विवाह सोहळ्यानंतर मीनाक्षी आणि सुन्दरेश्वर रथात बसून आपल्या भक्तांच्या भेटीसाठी जातात. कलजगार  देव म्हणजे विष्णूचा एक अवतार . हा मीनाक्षीचा बंधू. मीनाक्षीच्या विवाहाला उपस्थित राहणे त्याला शक्य होत नाही आणि मग वैगई नदीच्या तीरावर तो नवं दाम्पत्याला भेटतो आणि त्यांच्या विवाहबद्दल त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे शुभचिंतन करतो . जसा मी तसा माझा देव याची प्रचिती  या विवाहसोहळ्यात दिसून येते . शतकानुशतके या मंदिरात मीनाक्षी आणि सुन्दरेश्वर यांच्या साक्षीने विवाह संस्कार करण्याची पद्धती येथे दिसून येते  ते यामुळेच !

शारदीय नवरात्री काळात दक्षिण  भारतात साजरा होणार गोलू / कोलू उत्सव म्हणजे बाहुल्यांचे प्रदर्शन . मीनाकाशी मंदिरात गोलू स्थापना होते आणि त्यामध्ये विविध पौराणिक कथा बाहुल्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात . कागदी लगदा, माती, लाकूड यापासून तयार केलेल्या बाहुल्या पायऱ्या पायऱ्यांच्या  रचनेत मांडल्या जातात हे या गोलू उत्सवाचे वैशिष्ट्य होय .

 पुरा नवं भवति  इति  पुराणं ।  अशी पुरणाची  व्याख्या सांगितली जाते . जे प्राचीन आहे ते ग्रंथात सापडते  आणि जे नवे आहे ते आधुनिक काळातही या उत्सवांच्या रूपाने भाविकांसमोर उलगडत जाते. पुराणातील कथा याची देही याची डोळा अनुभविण्याची संधी देणारे भगवान मीनाक्षी आणि सुन्दरेश्वर.



या लिंकवर  मीनाक्षी आणि सुन्दरेश्वर  यांच्या विवाहाचा सोहळा आवर्जून पहा .

 वेधक आणि वेचक

·         मीनाक्षी मूर्ती ही सुंदर काळ्या ग्रॅनाईटची आहे. मीनाक्षीच्या उजव्या खांद्यावर पोपट शिल्प आहे, येथे पोपट हे प्रेम आणि बुद्धीचे  प्रतीक आहे. 

·         मंदिराच्या आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू हा मीनाक्षीचा भाऊ आहे

 उपसंहार

मदुराईचे मीनाक्षी मंदिर हे प्रेम आणि शौर्य यांचे आध्यात्मिक प्रतिनिधित्व करते. एकाच वेळी विवाहाचे पावित्र्य आणि भक्ती रसाचा सागर या दोन्हींचा सुयोग्य संयोग  इथे झालेला दिसतो. देवी मीनाक्षीचे हे निवासस्थान  जरी शक्तिपीठ नसले तरी हे मंदिर दैवी स्त्रीत्वाचे तितकेच सामर्थ्यशाली आणि लालित्यपूर्ण प्रकटीकरण आहे.



Comments