बद्रीनाथ, गढवाल, उत्तराखंड

 परिचय


हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये देवदेवतांचा युगानुयुगे निवास आहे अशी भारतीयांची अढळ श्रद्धा आहे. हिमालय हा देवतात्मा आहे आणि त्यात ही गढवाल-कुमाऊ म्हणजे साक्षात देवभूमी आहे. याच गढवाल आणि कुमाऊच्या सीमेवर, हिमालयाच्या प्रांगणात, देवदार वृक्षांच्या सावलीमध्ये, अलकनंदेच्या नील-धवल खळखळत्या प्रवाहाच्या काठावर भगवान श्री विष्णूचे परम धाम म्हणजेच बद्रीनाथ आहे.

ऋषिकेशच्या अध्यात्मप्रवण पवित्र स्थानी गंगा नदी शेकडो लहरींनी भक्तांना आशीर्वाद देते. तिथून पुढे हिमालयाच्या अंतरंगात प्रवास करताना पहिला थांबा म्हणजे देवप्रयाग, जिथे भागीरथी नदीचा संथ खोल प्रवाह फेसाळत्या अलकनंदेला मिळतो. या भागीरथीच्या तीराने उत्तर दिशा गाठली कि गंगोत्री-गोमुख म्हणजे श्री गंगेचा उगम दृष्टीपथात येतो. देवप्रयाग होऊन पुढे गेले की लागते रुद्रप्रयाग, जिथे डौलदार वळणे घेत येणाऱ्या मंदाकिनी चा प्रवाह अलकनंदा सामावून घेते. ह्या मंदाकिनी च्या तीराने उत्तरेस प्रवास केला कि येते श्रीमहादेवाचे परमस्थान केदारनाथ. आणि मग अलकनंदेच्या तीराने आपण उत्तरेकडे निघालो कि पोचतो बदरीकावनातील म्हणजे बोरीच्या वनातील नारायणाच्या निवासस्थानी म्हणजे अर्थात बद्रीनाथ !

 बद्रीनाथ हे १०८ दिव्य देशम म्हणजे विष्णू मंदिरांच्या यात्रेमध्ये धरले जाते. त्याचप्रमाणे ते यमुनोत्री-गंगोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ ह्या हिमालयातील चार धाम यात्रेचाही अविभाज्य भाग आहे. बद्रीनाथ मंदिराच्या जवळ तप्त कुंड, व्यास गुंफा , सरस्वती नदी अशी काही महत्वाची स्थाने आहेत.

 साधारण दहा हजार फुटांवर उंची असलेले हे विष्णू स्थान हिवाळ्यामध्ये बर्फाच्या चादरीखाली असते. म्हणूनच ही  हिमालयातील चारही धामे  दिवाळी नंतर भक्तांसाठी आपले कवाड ओढून घेतात आणि अक्षय तृतीयेस वसंत ऋतूच्या साक्षीने पुन्हा उघडतात. मधल्या काळात हिमालयातील जरा खालच्या उंचीवरच्या देवस्थानांमध्ये त्यांचा निवास असतो अशी लोक धारणा आहे. त्यानुसार बद्रीनाथ मधील श्रीविष्णू हे पांडुकेश्वर येथे निवासास येतात.

 अगदी नजीकच्या भूतकाळापर्यंत मोजक्या घरांची वस्ती असणारे बद्रीनाथ धाम आता प्रवासाच्या सोयीमुळे गजबजलेले तीर्थक्षेत्र झाले आहे.



 इतिहास

उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्ययातले बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र.  गावाप्रमाणेच जवळच्या २३००० फूट उंच हिमाच्छादित पर्वतशिखराचे नाव हि बद्रीनाथच आहे.

 श्री शंकराचार्यांनी अलकनंदेच्या प्रवाहात , नारद कुंडामध्ये मिळालेल्या काळ्या पाषाणात घडवलेल्या आसन मूर्तीची म्हणजे बैठ्या विष्णू मूर्तीची बद्रीनाथ येथे प्रतीष्ठापना केली. अर्थातच महाभारतामधील आणि पुराणातील अनेक संदर्भ आपल्याला बद्रीनाथ धामाची प्राचीनता आणि महत्ता वर्णन करताना मिळतातच. पुराण  कथांनुसार, नर आणि नारायण यांनी  इथे तपस्या केली.

 स्कंद पुराणातील खालील श्लोकानुसार प्रत्येक युगामध्ये ह्या नगरीचे नाव वेगळे असून कलियुगात ते बदरिकाश्रम म्हणजे सध्याचे बद्रीनाथ गाव आहे.

 कृते मुक्ति प्रदा प्रोक्ता नेतायां योगसिद्धिदा विशालाद्वापरे प्रोक्ता कलौ बदरिकाश्रमः

 पुढील काळात भूकंप, बर्फाच्या दरडी यामुळे बद्रीनाथाचे मंदिर अनेकदा बांधले गेले. सध्याची चमकत्या रंगातील सुंदर वास्तू  गढवाल नरेशानी -१५व्य शतक यामध्ये बांधली आहे.पांडुकेश्वर म्हणजे योगध्यान बद्रीच्या मंदिरामध्ये ताम्रपट मिळाले आहेत, ज्यामध्ये तत्कालीन राजांनी दिलेल्या देणग्यांचे वर्णन आहे. विशेष म्हणजे त्यात प्रवर्धन विजय संवत, कालगणने साठी वापरला गेला आहे.


 स्थापत्य

वैष्णव संप्रदायातील १०८ दिव्य देसम म्हणजे पवित्र वैष्णव तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे बद्रीनाथ! सहा महिने बर्फाच्छादित राहणाऱ्या या मंदिरात सहा महिन्यात सुमारे ८५ लाख भाविक येतात. योग मुद्रेतील विष्णू इथे विराजमान आहेत. मागच्या दोन हातात शंख चक्र धारण केले असले तरी समोरचे दोन हात योग मुद्रेत आहेत. अलकनंदा नदीकाठी हिमालयाच्या गढवाल रांगांमधे हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. विष्णू पुराण, स्कंद पुराण आणि तमिळ अलवार संत साहित्यात बद्रीनाथ मंदिराची माहिती येते. आदि शंकराचार्यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी इथे वास्तव्य केले होते.

सुमारे इ.स. आठव्या शतकात परमार राजा कनकपाल यांनी बांधलेल्या या मंदिराच्या देखभालीसाठी बाजूची गावे दान दिली. परमार राजांच्या शिलालेखात बद्रीनाथाचे व मंदिराचे उल्लेख सापडतात.

गाभारा, अंतराळाच्या जागी आयताकार दर्शन मंडप आणि पुढे   सभा मंडप असे मंदिराचे मुख्य भाग आहेत. काहीशा उंच अधिष्ठानावर बांधलेल्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराभोवती विस्तृत आवार आहे.

 गाभाऱ्यावर परमार मंदिर शैलीशी मिळतेजुळते नागर पद्धतीचे शिखर आहे. पन्नस फूट उंच चौरसाकार शिखरावर चारही बाजूंनी मधोमध रहपग आहे. त्यामुळे शिखराचे उभे तीन भाग होतात. वर आमलक आहे. मात्र गढवाल शैलीनुसार त्याभोवती चौरसाकार लाकडी छत्र बांधले आहे. शिखर आणि आमलक यांच्या मधल्या भागाला स्कंध म्हणतात. त्यावर हे चौकोनी लाकडी छत्र पक्के बसवले आहे. त्यावर सोन्याचा कळस आहे.

   मुख्य मंदिरात गाभाऱ्यात जाताना अंतराळ आहे त्याला दर्शन मंडप म्हणतात. इथे कुबेर, नारद, उद्धव, नर नारायण यांच्या मूर्ती आहेत. सभा मंडपात सुंदर कोरीवकाम केलेले खांब आहेत.

मुख्य मंदिराच्या अधिष्ठानावरून खाली उतरल्यावर पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो असे विस्तृत मोकळे आवार आहे. या मोकळ्या जागे पलिकडे लहान मोठी पंधरा मंदिरे आहेत. त्यात लक्ष्मी नृसिंह, आदि शंकराचार्य, लक्ष्मी, गरूड, नवदुर्गा, रामानुजाचार्य यांच्या मूर्ती आहेत. ही सर्व मंदिरे काळ्या पाषाणाची आहेत. मुख्य बद्रीनाथ मंदिरदेखील काळ्या पाषाणाचे आहे. या सर्व परिसराभोवती भक्कम तट बांधलेला आहे. या तटाला एक प्रवेशद्वार आहे जे वैशिष्ट्यपूर्ण गढवाली शैलीत बांधलेले आहे. पायऱ्या चढून या प्रवेशद्वारातून आत जाताना विष्णूवाहन गरुडाचे दर्शन होते. दक्षिण भारतातील द्रविड मंदिर स्थापत्यात प्रवेशद्वार भव्य आणि सुंदर नक्षीकामाने नटलेले असते ज्याला गोपुर म्हणतात. महाराष्ट्रातील सतराव्या अठराव्या शतकातील मंदिरांना प्रवेशद्वारावर कमानींनी सजलेल्या खोल्या असतात. त्यामधे नगारखाना असतो. तशीच रचना बद्रीनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिसते. सुंदर कमानी, आकर्षक रंगांनी रंगवलेली चित्रे आणि खिडक्यांनी सजलेले हे प्रवेशद्वार लाकडाचे आहे. त्यावरच्या तरंगहस्तांवर हत्ती, मोर, हंस अशा शुभ मानलेल्या प्राण्यापक्ष्यांची शिल्पे आहेत.

बद्रीनाथ मंदिराच्या बांधकामासाठी विचारपूर्वक दगड आणि लाकडाचा वापर केला आहे.

आठव्या शतकात बांधलेल्या मूळ मंदिरावर वेळोवेळी नैसर्गिक आघात झाले त्यामुळे नंतरच्या काळात पुन्हा बांधकाम करावे लागले. सोळाव्या शतकात गढवाल घराण्याचे शासक अजयपाल यांनी आवारातील बरेच काम केले होते. परत सन १८०३ मधे झालेल्या भयंकर भूकंपाने मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी जयपूरच्या महाराजांनी दुरुस्ती व पुनर्रचना केली. आजही बद्रीनाथ मंदिराच्या देखभालीची जबाबदारी गढवालचे परमार आणि त्रावणकोरचे राजघराणे यांचा समावेश असलेल्या कमिटीकडे आहे.

उत्सव आणि परंपरा

भक्त - आणि देव यामध्ये ज्यावेळी निसर्गालाही  सहभागी करून घेतले जाते आणि निसर्गाच्या नियमित प्रक्रियेला उत्सवी जोड दिली जाते तेंव्हा वैदिक साहित्यात वर्णन केलेले ऋत  म्हणजे निसर्गनियम आणि सत्य म्हणजे परमेश्वर यांचे  परस्परांशी असलेले नाते आपल्याला सहज अनुभवता येते . ही प्रचिती देणारे बद्रीनारायणाचे मंदिर !

 सुदूर हिमालयातील बर्फ़ाने आच्छादित पर्वतशिखरे ,उंच उंच वृक्षराजीने समृद्ध परिसर आणि मंदिरात विराजमान नारायण अर्थात बद्री विशाल ! या देवतेच्या पूजेला केवळ भक्तीची जोड नाही तर निसर्गही आपल्याला येथे अंतर्मुख होण्याची संधी देतो . साधू, बैरागी , गृहस्थभक्त या साऱ्याने  गजबजलेला हा परिसर . जसा मी तसा माझा देव ! इतक्या उंचावर बर्फ़ाने परिसर झाकला गेला की या परिसरात राहणे माणसाला व्यवहारत :  कठीण होते , किंबहुना अशक्य असते. सहसा आपल्याला दिसून येते की एखाद्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन विराजमान झालेली देवतेची मूर्ती तिथून हलविली जात नाही .परंतु या मंदिरात आपल्याला दिसून येईल श्रद्धेला दिलेली व्यवहाराची जोड ! देवभूमीत देव अविचल राहू शकेलच पण मानवाला मर्यादा आहेत त्यामुळे बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन्ही मंदिरातील देवतांना थंडीच्या काळात खालच्या गावांमध्ये आणले जाते आणि थंडी संपून उन्हाळा सुरु होईपर्यंत या मंदिरात त्यांची पूजा केली जाते . उन्हाळ्यामुळे हळूहळू बर्फ वितळल्यावर येथे स्वच्छता करून मग देवाची पूजा सुरु होते . या सर्व प्रक्रियेला स्थानिक भाषेत “कपाट  बंद करना आणि  खोलना” असेच स्थानिक भाषेत म्हटले जाते . पण हे सारे केवळ व्यवहार म्ह्णून न पाळता यालाही पूजा -उपचारांची जोड देण्याची परंपरा येथे अनेक शतके अबाधितपणे जपली गेली आहे असे आपल्याला दिसून येईल.

दिवाळी हा येथील विशेष उत्सदव मनाला जातो कारण दिवाळीनंतर येथील मंदिर बंद केले जाते . त्याचीही विशिष्ट पद्धती आहे .

सर्वात आधी या मंदिर परिसरातील श्री गणेशाचे मंदिर विधीवत पूजा करून बंद केले जाते . त्यानंतर आदी केदारेश्वर  मंदिर बंद होते . चार दिवस चालू असलेल्या या उत्सवात मंदिर बंद करण्यापूर्वी वेदमंत्रांचे येथे सुरु असलेले पठण काही काळासाठी थांबविण्यात येते त्याआधी ग्रंथपूजन केले जाते . नारायणासह दीर्घकाळ  एकांतात निवास करण्यासाठी देवीला आमंत्रित केले जाते आणि तिला विशेष नैवेद्य दाखविला जातो . शेवटच्या दिवशी येथील पूजेचा मान असलेल्या रावळ  जमातीच्या पुरोहितांकडून विशेष पूजा केली जाते जिला ‘सखी- भाव पूजा’ म्हटले जाते . हे पुरोहित स्त्रीचा वेष परिधान करून देवीची मूर्ती वाजतगाजत आणतात आणि तिला बद्रीनारायणाशेजारी विराजमान करतात . त्यानंतर तुपात भिजविलेले एक लोकरीचे उबदार कांबळे देवतेभोवती लपेटून ठेवले जाते आणि नंतरच फुलांनी सजविलेल्या मंदिराची दारे दीर्घकाळासाठी बंद केली जातात . येथील उद्धव आणि कुबेर यांच्या मूर्ती वाजतगाजत पांडुकेश्वर या ठिकाणी आणल्या जातात . पांडुकेश्वर  हा परिसर सुद्धा मंदिरांनी समृद्ध आहे.

 अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिर उघडले जाते आणि त्याची तयारी वसंत पंचमी पासून सुरु होते . थंडीने गारठलेल्या भगवंताला उब मिळण्यासाठी तयार केले जाते तीळाचे  तेल. नरेंद्रनगर येथील राजपरिवारात ही परंपरा शतकानुशतके जपली गेल्याचे आपल्याला दिसून येते . राजपरिवारातील सुवासिनी स्त्रिया पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून यंत्राचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने तीळाचे  तेल काढतात . हे तेल चांदीच्या कलशात   भरून ते वाजतगाजत मूळ मंदिरात नेले जाते यालाच घडू  घडा असे म्हटले जाते . या सोहळ्यामध्ये स्थानिक भाविक सहभागी होतातच परंतु जगभरातून पर्यटकही हा सोहळा अनुभविण्यासाठी येतात . उद्धव , कुबेर यांच्याही मूर्ती आता मूळ मंदिरात नेल्या जातात .

मंदिर उघडण्याचा विधी झाल्यावर सर्वप्रथम देवावरील कांबळे काढले जाते आणि उब देणाऱ्या तीळाच्या  तेलाने अभिषेक केला जातो . त्यांनतर नेहमीचे पूजा उपचार केले जातात . नारायणाला वस्त्रे , दागिने घातले जातात आणि मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते . मूळ मंदिरातून बाहेर आणलेल्या देवता पुन्हा आपापल्या मंदिरात विधीवत नेऊन स्थापन केल्या जातात .

याजोडीने कृष्णजन्माष्टमीचा उत्सवही येथे उत्साहाने साजरा केला जातो .

वेधक आणि वेचक

  • ·         बद्री विशाल म्हणजेच बद्रीनाथ, योगध्यान बद्री (हिवाळ्यातील बद्रीनाथ धाम), भविष्य बद्री , वृद्धबद्री, आदीबद्री  हि हिमालयातील पंचबद्री विष्णूस्थाने बद्री परिक्रमेचा भाग आहेत. पंचबद्री  तसेच पंचकेदार ह्या हिमालयातील महत्वाच्या शिव आणि विष्णू परिक्रमा आहेत
  • ·    बद्रीनाथाच्या मंदिरातील पुजारी, अर्चक   हे केरळमधील नंबुद्री ब्राहमण असतात

 

उपसंहार

बद्रीनाथ हे भारतीयांच्या अध्यात्म यात्रेचे निजधाम आहे. साक्षात लक्ष्मी -नारायणाचे निवासस्थान, अलकनंदा म्हणजेच गंगा नदीचे सदा सानिध्य आणि देवतात्मा हिमालयाचे प्रबळ संरक्षण असे कोंदण लाभलेले तीर्थस्थान नक्कीच श्रेष्ठ ठरते




Comments

Post a Comment