श्री रंगनाथ स्वामी मंदिर, श्रीरंगम
इतिहास
१२-१५ शतकांपूर्वीच्या काळात या मंदिराचे बांधकाम,
पुनर्बांधणी आणि विस्तार करण्यात आला. मंदिरातील शिलालेख उरैयूर येथील
सुरुवातीच्या चोल (१ले शतक) राज्यकर्ते, नंतर चोल (१३वे शतक), पश्चिमेकडील
तामिळ कांगू शासक, दक्षिणेकडील पांड्य (६वे - १०वे शतक आणि १३वे -
१४वे शतक), होयसळ (१०वे - १४वे शतक) आणि कर्नाटकातील विजयनगर
साम्राज्याचे राजे (१६वे शतक) आणि नंतर मदुराई नायक शासकांनी या भव्य मंदिराच्या
बांधकाम आणि देखभालीमध्ये दिलेल्या योगदानाची माहिती देतात.
स्थापत्य
सात भिंतींनी वेढलेले द्रविड शैलीचे हे मंदिर आध्यात्मिक अर्थाने समृद्ध आहे. आत्म्याला व्यापणाऱ्या पदार्थाच्या सात थरांचे प्रतीक म्हणजे हे सात प्राकार आहेत. संपूर्ण श्रीरंगम् शहराला व्यापणारे हे मंदिर म्हणजे सर्जनशील मानवी प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहे!
चार मुख्य दिशानुरूप बांधलेल्या आणि कावेरी नदीने वेढलेल्या श्रीरंगम् मंदिर परिसरात २१ गोपुरम् म्हणजेच प्रवेशद्वार आहेत. दोन बाह्य प्राकारांमधे बाजारपेठ आणि रहिवाशांची घरे आहेत. आतील पाच प्राकारांमधे विष्णू आणि इतर देवदेवतांच्या विविध अवतारांची मंदिरे आहेत. या वास्तुकलेची रचना तमिळ परंपरेतील आगम ग्रंथांनुसार केली आहे. गोपुरे, मंडप आणि खांब यांसारखी वास्तुशिल्पीय वैशिष्ट्ये मुख्य दिशानिर्देशांनी निर्देशित केलेल्या अक्षावर बांधलेली आहेत. गोलाकार गर्भगृहावर सोन्याचा मुलामा दिलेले श्रीरंग विमान आहे.
मुख्य देवता श्रीरंगनाथ पेरुमल दक्षिणेकडे तोंड करून आदिशेषावर विराजमान आहेत. गर्भगृहात विभीषण, ब्रह्मा, हनुमान यांच्या मूर्ती दिसतात. गर्भगृहात विष्णूचे वाहन गरुड, सुदर्शन चक्र आणि त्याचा शंख - पांचजन्य यांच्या मूर्ती देखील ठेवल्या आहेत. गर्भगृहाभोवतीचा प्रदक्षिणापथ हा छताने झाकलेला आहे त्यामुळे हे सांधार मंदिर आहे. चक्रथलवारच्या मागील बाजूस नरसिंह प्रतिमा कोरलेली आहे आणि प्रदक्षिणापथावरून ती पाहता येते. गर्भगृहानंतर अंतराल आणि महामंडप आहे.
विमानाच्या बाहेरील भागात आणि महामंडपात उभ्या रेखांचे, दोन स्तंभशीर्ष असलेले, उलट्या कमलदलांचे कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. मंदिराच्या भिंतींवर तीन बाजूंच्या कोनाड्यांमध्ये शिल्पे कोरलेली आहेत आणि भिंतीवर सुर-सुंदरींचे अंकन आहे. गर्भगृहावरती पारंपरिक पद्धतीचे अर्ध गोलाकार शिखर म्हणजेच 'स्तुपिका' आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर दुहेरी कमान आहे. नंतर कोरलेले स्तंभ सभामंडपाच्या भिंतीत लपलेले आहेत. मंदिराचे सध्याचे स्वरूप आणि संरचना ही राजा कुलोत्तुंग चोल यांच्या राज्यकाळातील आहे.
मंदिराच्या परिसरात रंगनायकी अम्मनला समर्पित एक वेगळे मंदिर आहे. देवीचा उल्लेख नैतिकतेच्या सीमा न ओलांडणारी स्त्री असा आहे. खरोखरच, रंगनायकीची उत्सव मूर्तीदेखील कधीही मंदिराबाहेर येत नाही. स्वतः रंगनाथ रंगनायकीला भेट द्यायला जातात. गर्भगृहात रंगनायकीच्या तीन प्रतिमा आहेत.
मंदिर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य मानवी मनाला आकर्षित करणारे आहे.
श्रीरंगम मंदिरातील देवस्थाने
|
चक्रथळवार
तीर्थक्षेत्र |
पूर्वेकडे, दक्षिणेकडे तोंड करून अकलंका
परिसराची बाजू |
|
वेणुगोपाल
मंदिर |
मंदिराच्या
चौथ्या प्राकाराचा नैऋत्य कोपरा चोक्कनाथ
नायकाच्या काळात बांधले. |
|
नरशिमा, राम, हयग्रीव आणि गोळापा कृष्ण |
मंदिराच्या
परिसरात |
|
औषधाची
देवता धन्वंतरी |
मंदिराच्या
परिसरात |
मंडप
|
१००० खांबांचा मंडप |
श्री रंगनाथस्वामी मंदिरात अनेक मंडप आहेत.
त्यापैकी हजार स्तंभ असलेला मंडप एखाद्या रंगमंचाप्रमाणे
बांधलेला आहे. १००० खांबांचा हा हॉल ग्रॅनाइटपासून बनलेला आहे आणि विजयनगर काळात
(इ.स.१३३६-१५६५) बांधला गेला आहे. हे खांब वेगवेगळ्या आकाराचे आहेत.
कमलपुष्पांचे कोरीव काम केलेले दंडगोलाकार खांब हे विजयनगर साम्राज्याच्या
काळातील आहेत. या उंच खांबावरती घोडेस्वार आणि त्यांचे गतिमान घोडे यांची रेखीव
शिल्पे आहेत. ह्या मंडपाच्या मध्यभागी पूर्ण लांबीचा वाहतूक
मार्ग आहे आणि त्याला काटकोनमध्ये छेदणारे अनेक लघु मार्ग आहेत. प्रत्येक बाजूला अशा सात मार्गिका आहेत. सर्व
खांब समान अंतरावर आहेत. वार्षिक वैकुंठ एकादशी
उत्सवादरम्यान इथे मोठ्या संख्येने भक्त जमतात. देवाचा हा जणू एक प्रकारचा 'दरबार
हॉल' आहे. हजार खांबांच्या मंडपाच्या काही खांबांवर
तमिळ शिलालेख आहेत. |
|
शेषगिरी
मंडप |
हजार
स्तंभांच्या मंडपासमोरील एका लहान दालनाला "शेषगिरी मंडप" म्हणतात. ते
सुंदर शिल्पांनी सजवलेले आहे. विजयनगर राजांच्या उत्तरकाळातील
हे अश्वदालन सोळाव्या शतकातील भव्य स्थापत्य शैलीचा कळस दर्शवतो. फुरफुरणार्या
घोड्यांच्या शिल्पकृतींचा हा एक उत्तम नमुना आहे. जवळजवळ नऊ फूट उंच असलेल्या या
आक्रमक अश्व शिल्पांखाली , त्यांच्या
उंचावलेल्या खुरांच्या खाली तलवारी आणि ढाली
धरलेल्या सैनिकांच्या प्रतिमा आहेत. छिन्नीच्या अचूक तंत्रामुळे घोड्यांच्या
दालनातील खांबांवर धातूसारखी चकाकी आली
आहे. हा मंडप उड्या मारणार्या, गतिमान
प्राण्यांच्या चाळीस शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. शेषराय मंडपात, उसळणाऱ्या
घोड्यांवरील स्वारांची शिल्पे असलेले एकपाषाणी खांब आहेत. मोठ्या
संख्येने वाघांची डोकी कोरलेली आहेत. |
|
गरुड मंडप |
विजयनगर राजांची आणखी एक भर म्हणजे तिसऱ्या
प्राकाराच्या दक्षिण बाजूला असलेले, विष्णूचे
वाहन पक्षीराज गरुडाचे सभागृह! आधीच्या मंदिरवास्तू मधील शिल्पे इथे पुन्हा वापरली गेली आहेत. मंडपाच्या
मध्यवर्ती खांबांवर ती पुन:स्थापित केली आहेत. सभागृहाच्या आत एका स्वतंत्र
मंदिरात गर्भगृहाभिमुख अशी गरुडाची एक मोठी आसनस्थ
मूर्ती आहे. |
|
किली मंडप (पोपटाचा दालन) |
किली मंडप मंदिराच्या पहिल्या प्राकारात रंगनाथ
मंदिराशेजारीच आहे. या मंडपात जाताना लागणाऱ्या पायऱ्यांच्या
बाजूला कठड्यांवर हत्ती कोरलेले दिसतात. या भागाला 'हस्त'
म्हणतात. या पायऱ्या आपल्याला एका प्रशस्त दालनामधे घेऊन जातात.
सतराव्या शतकातील स्थापत्यशैलीनुसार या मंडपाच्या बाजूच्या ओवर्या सुबक प्राणी
प्रतिमा आणि कोरीव खांबांनी सजलेल्या आहेत. मध्यभागी उंच स्तंभ युक्त व्यासपीठ आहे. चार
मुख्य खांबावरती वळणदार वेलींचे रेखीव अंकन आहे. |
|
रंगविलास
मंडप |
रंगविलास मंडप आकाराने खूप मोठा आहे आणि
रामायणातील शिल्पे आणि उत्कृष्ट भित्तीचित्रांनी सजलेला आहे. |
|
नामपेरुमल
थिरुमणी मंडपम |
हा
खास लघु मंडप हजार खांबांच्या मंडपात आहे. इथे दोन्ही बाजूला घोडे स्वार आणि रथ
कोरलेले आहेत. सभागृहाला वेगवेगळ्या शैलीतील अनेक खांबांचा आधार आहे. |
पुष्करिणी
या
मंदिर संकुलात चंद्र पुष्करिणी आणि सूर्य पुष्करिणी नावाचे दोन मोठे मंदिर तलाव
आहेत. पावसाचे पाणी यात साठवले जाते. प्रत्येक पुष्करिणीची
क्षमता सुमारे वीस लाख लिटर पाणी साठविण्याची आहे.
पाणी स्वच्छ करणारे मासे यात आहेत.
या
मुख्य तलावांव्यतिरिक्त श्रीरंगमभोवती आणखी १० मंदिर तलाव आहेत जे मंदिराच्या
नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली येतात. परिसरातील वाळू अंथरलेली जमीन आणि
फुलबागा हे पावसाचे जास्तीचे पाणी रिचवण्यास मदत करतात.
चित्रकला
मंदिर संकुलाच्या भिंतींवर नैसर्गिक
आणि वनस्पती रंगांचा वापर करून उत्कृष्ट भित्तीचित्रे रंगवण्यात आली
आहेत. ही चित्रे तत्कालीन संस्कृती आणि परंपरेबद्दलमाहिती देतात . देवी-देवतांच्या
मूर्ती आपल्याला कथा सांगतात आणि नैतिकता शिकवतात. या चित्रांमध्ये वापरल्या
जाणाऱ्या उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे या चित्रांचे आयुष्य दीर्घकाळ टिकते आणि
या आधुनिक काळात त्यांची नव्याने निर्मिती हे एक कठीण आव्हान आहे.
साहित्य
वैष्णव संप्रदायात दिव्यदेशम् ही संकल्पना विशेष औचित्यपूर्ण आहे.या दिव्यदेशांची संख्या १०८ अशी मानली गेली आहे. श्रीरंगनाथाचे मंदिर हे सुद्धा एक दिव्यदेशच मानले गेले आहे. दिव्यदेश मंदिरांमधे विष्णूच्या मूर्तीपूजेसाठी विविध नियमावली सांगितल्या गेल्या आहेत.यामधे विष्णूपूजेची विधी विधाने,त्यासाठीचे उपचार,मंत्र या सर्वांचा समावेश होतो.
देवतेचा गुणगौरव करणार्या,
![]() |
या रचनांच्या जोडीने विष्णुस्तुतीने नटलेल्या विविध काव्यांची निर्मितीही स्थानिक संतांनी,विद्वानांनी केलेली दिसते. श्रीरंगम् येथील पराशरभट्ट यांनी श्रीविष्णुसहस्रनामावर आधारित भवद्गुणदर्पण ही रचना बांधलेली आहे जी विशेष प्रसिद्ध आहे.
उत्सव आणि परंपरा
२१ दिवसांपर्यंत सुरु असलेला वैकुंठ एकादशीचा उत्सव हा श्रीरंगम् येथील श्री नामपेरूमल आणि श्रीरंगनाथ यांचा विशेष उत्सव आहे.उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिराच्या प्रांगणात भव्य मिरवणूक आयोजित केली जाते.
रंगा रंगा गोविंदा गोविंदा ज्या जयघोषात,वेदोक्त
मंत्रपठणाने भारलेल्या वातावरणात ही मिरवणूक उत्तरोत्तर रंगनाथाच्या भक्तीत रंगून
जाते.याज जोडीने भक्तांचे व पर्यटकांचे आकर्षण असलेले आदि ब्रह्मोत्सव
(जुलै-आॅगस्ट), चैत्रीय रथोत्सव (मार्च-एप्रिल) हे उत्सवही साजरे
होतात.
ज्येष्ठाभिषेकम् म्हणजे देवतेचे सुवर्णालंकार
उजळविण्याची एक पूजापद्धती होय.या काळात कावेरी नदीचे पाणी सोन्याच्या कलशांमधे
भरून आणले जाते व त्याचा रंगनाथाला अभिषेक केला जातो.सुगंधी द्रव्ये,उटणे
यांनी विग्रहांना लेपन केले जाते.मोती,हिरे,रत्ने
यांच्या दागिन्यांनी देवाला आभूषित केले जाते.
भक्तांच्या भक्तीत रंगलेला हा रंगनाथ अनुभविणे हा एक अभूतपूर्व सोहळाच आहे.
वेधक आणि वेचक
• राजगोपूर सध्या २४० फूट उंचीवर उभा आहे, तो १३ मजली गोपुर स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे. हे गोपुर बराच काळ अपूर्णावस्थेत होते , अखेर १९८७ मध्ये ते पूर्ण झाले.
• वेल्लई गोपुरम १४६ फूट उंचीचे प्रभावी देखणे गोपुर आहे वेल्लईच्या स्मरणार्थ ते नेहमीच पांढऱ्या रंगात रंगवले जाते. वेल्लई म्हणजे एक नर्तकी जिने मलिक काफूरच्या आक्रमणकारी इस्लामिक सैन्याला चकवताना वळवताना आपले जीवन बलिदान दिले आणि वैष्णवांना देवतेला परिसराबाहेर हलविण्यासाठी काही वेळ दिला.
• रंगनाथस्वामीच्या डोळ्यातील हिरा १८ व्या शतकात एका फ्रेंच चोरट्या जवानाने हिसकावून घेतला आणि आपल्यासोबत नेला. तो आता ऑर्लोव्ह हिरा म्हणून ओळखला जातो आणि रशियन राजाच्या मुकुट रत्नांमध्ये त्या हिऱ्याला स्थान मिळाले आहे.
समारोप
श्रीरंगमच्या पवित्र मंदिरात आदि शंकर भगवत्पाद लिखित रंगनाथ अष्टकम् स्तोत्राने श्री रंगनाथ स्वामींच्या या मंदिर गाथेचा शेवट करीत आहोत.








मस्त माहितीपूर्ण
ReplyDelete