लिंगराज मंदिर, भुवनेश्वर
परिचय
भुवनेश्वर , म्हणजे ओडिशाची सध्याची राजधानी.
भुवनेश्वर हे नाव त्रिभुवनेश्वर अर्थात
तिन्ही जगाचा अधिपती अशा अर्थाचे आहे. महानदी ह्या मोठ्या नदीची एक वितरिका
असलेल्या दया नदीच्या काठावरील हे शहर , पूर्वीपासूनच १००० मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
आणि तिथले लिंगराज मंदिर म्हणजे जणू काही मंदिररत्न , त्रिभुवनेश्वर
शंकराचे स्थान आणि त्याला शोभेसे वैभवशाली,
भव्य
स्थापत्य! बिंदू सरोवराच्या तीरावर
दृष्टिपथास येणाऱ्या क्षितीजावर लिंगराज
मंदिराच्या १५० फूट उंच मंदिर शिखराचे निर्विवाद वर्चस्व आहे.
लिंगराज मंदिर परिसर म्हणजे विविध आकाराच्या, अलंकारिकतेच्या
आणि अभिमुखतेच्या, सुमारे ५० मंदिरांचे प्राकार भिंतींनी वेढलेले महा-संकुल आहे.
शतकांची जागती परंपरा असलेले
लिंगराज हे नावाप्रमाणेच विशाल असे आकाराने वर्तुळाकार आणि काळ्या दगडात कोरलेले
एक महा शिवलिंग आहे. येथे लिंगराज शिवलिंग हे हरिहर रूपामध्ये आहे ज्यात शिव आणि विष्णू हे
दोघेही एकत्र निवास करतात. याच मंदिर
प्राकारामध्ये पार्वती म्हणजे उमा देवीचे ही तितकेच देखणे मंदिर उभे आहे
लिंगराज मंदिर परिसराचे सौंदर्य आणि स्थापत्य -ऐश्वर्य विलक्षण आहे.
येथील प्रत्येक मंदिर हे कलिंग स्थापत्य शैलीचे सुंदर उदाहरण आहे.
इतिहास
ओड्र, पुंड्र आणि कलिंग ही ओडिशाची प्राचीन नावे आहेत.
कपिल पुराण आणि एकाम्र पुराणानुसार या भूमीला एकाम्र क्षेत्र
म्हणूनही ओळखले जाते.
ज्ञात इतिहासानुसार मगधचा राजा अशोक याने इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात
कलिंग प्रदेश जिंकला. या प्रदेशातील
त्यानंतरचा प्रमुख राजा म्हणजे जैन
धर्माचा अनुयायी चेतराज खारवेल ज्याने पहिल्या सहस्रकाच्या सुरुवातीला राज्य
केले. पुढील काही शतकांचा इतिहास अस्पष्ट
असला, तरी इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर शैलोद्भव घराणे , गौड
राजा शशांक, सोमवंशी केसरी राजे , त्यानंतर गंग राज्यकर्ते आणि गजपती घराणे
या सर्वानी कलिंग प्रदेशावर इसवी सनाच्या
सोळाव्या शतकापर्यंत म्हणजे इस्लामी आक्रमणापर्यंत राज्य केले.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात बंगाल आणि ओरिसाच्या काही भागावर राज्य
करणारा गौड राजा शशांक याने बांधलेल्या त्रिभुवनेश्वराच्या मंदिराविषयी प्राचीन
ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. राजा ययाती आणि त्याचा मुलगा उदयोत केसरी यांनी महान
लिंगराज मंदिराचा, जगमोहन मंडप बांधल्याचे इतर काही ग्रंथांमध्ये सूचित केले आहे.
भुवनेश्वर शहरातील सर्वात मोठे मंदिर आणि शहराचा अधिष्ठाता देव असलेल्या लिंगराज
मंदिराची सध्याची वास्तू ११ व्या शतकातील आहे.
इसवी सनाच्या सातव्या शतकातील परशुरामेश्वर मंदिर हे परिसरातील सर्वात जुने
टिकलेले मंदिर आहे.
स्थापत्य
नागर मंदिर स्थापत्याची उपशैली म्हणजे ‘ कलिंग
मंदिर ‘ शैली!
लिंगराज मंदिर हे भुवनेश्वरचे सर्वात भव्य, मोठे व वैभवशाली
मंदिर आहे. दहाव्या - अकराव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिराची उंची सुमारे ५५
मीटर आहे. भुवनेश्वरच्या स्थापत्यकलेचा परमोत्कर्ष हे मंदिर दाखविते. ह्या
मंदिराला गाभारा, बंदिस्त सभामंडप, नृत्यगृह व अर्पणगृह अशी दालने आहेत. कलिंग
स्थापत्य शैलीमधे मंदिराच्या सर्व भागांना स्वतंत्र नावे आहेत. इथे गाभारा आणि
वरचे शिखर या भागाला ‘देऊळ’ म्हणतात. सभामंडप म्हणजे ‘ जगमोहन ‘ तर भोग मंडप
म्हणजे अर्पण गृह. लिंगराज मंदिर मुळात सोमवंशी राजांनी इ. स. आठव्या शतकात बांधले
होते. नंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या गंग वंशीय राजांनी त्याचा विस्तार केला.
नृत्य मंडप आणि भोग मंडप मागाहून बांधण्यात
आले आहेत. तरीही हे सर्व बांधकाम हजार वर्षे प्राचीन आहे.
नागर शिखरांचेही कोरीवकामानुसार प्रकार पडतात.
लिंगराज मंदिराच्या शिखरावर बारीक उभ्या रेषांचे नक्षीकाम आढळते म्हणूनच या
शिखराला ‘ लतिन ‘ नागर असं म्हणतात. कोरीवकामाच्या उभ्या पट्ट्यांना ‘ रेखा ’
म्हणतात तर आडव्या पट्ट्यांना ‘ बाड ‘ म्हणतात. इथे गाभाऱ्याची रचना पंचरथ
पद्धतीची आहे. म्हणजे भिंतीवर पाच उभ्या पट्ट्यांमधे कोरीवकाम, मूर्ती, विविध शिल्पे यांची
रचना केली आहे.
भिंतींच्या वरच्या भागांवर खाखर मुंदी आणि पिधा मुंदीची छानदार सजावट आहे. खाखर म्हणजे
हत्तीच्या पाठीप्रमाणे गोलाकार आणि पिधा म्हणजे पिरॅमिडच्या आकाराप्रमाणे दिसणारी
रचना. गाभाऱ्याच्या भिंतीवरची सुंदर शिल्पे बघत आपली दृष्टी टप्प्याटप्प्याने वर
जाते तेव्हा शिखराचा भाग सुरु होण्याआधी हत्तीच्या पाठीप्रमाणे गोलाकार आणि
पिरॅमिडप्रमाणे दिसणारा हा छज्जाचा भाग दिसतो. मंदिराच्या भव्यतेला, अधिकाधिक उंचीचा
आभास निर्माण करण्याला कुठेही अडसर होणार नाही अशीच शिल्प रचना केली आहे.
भिंतीच्या कोपऱ्यावरच्या उभ्या पट्ट्यांवर
म्हणजेच रथांवर खाखर-मुंदींच्या सजावटीत आठ दिक्पालांच्या आकृत्या आहेत. तर पिधा-मुंदींच्या सजावटीत विविध
देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. भिंतींच्या खालच्या अर्ध्या भागात व्याल आणि गज सिंह
यांची विविध सुंदर चित्रे काढलेली आहेत. त्याच्याही वरच्या भागात सुरसुंदरी व
नायिकांची शिल्पे आहेत.
शिवाच्या परिवारातील दैवते म्हणून गणेश, पार्वती व
कार्तिकेय यांच्या प्रतिमा प्रमुख महिरपी कोनाडयात असून त्यांचा आकार व रेखीवपणा
यामुळे त्या चित्तवेधक दिसतात.
मंदिराची भव्योदात्त उंची आणि त्याचा प्रशस्त
विस्तार भोवतालच्या परिसरावर छाप टाकतात. रथांवरील कोरीव उभ्या रेषा त्या परिणामात
भरच टाकतात. मधला उभा पट्टा - रथाच्या दोन्ही बाजूंच्या दोन रथांवर, सजावटीचा एक नमुना
या दृष्टीने कळसाच्या चार, लहान होत गेलेल्या प्रतिकृती आहेत. कळसाच्या मजल्यांची
संख्या १० पर्यंत वाढली आहे. कोपऱ्यांवरचे नक्षीकाम आणि भूमि व आमलक नावीन्यपूर्ण
आहेत. त्यांच्या बाजू चौरस व कोपरे गोल आहेत. सोंड वर करून बसलेल्या हत्तीवर झेप
घेणाऱ्या सिंहाची वैशिष्टयपूर्ण आकृती मधल्या रथावर आढळते.
शिखरावर आवळ्यासारख्या उभ्या रेषांची रचना
असलेली गोलाकार चकती दिसते. त्याला ‘आमलक’ म्हणतात . कलिंग स्थापत्य शास्त्रात
त्यालाच ‘अमलसार’ म्हणतात. कळसावर हा आवळ्यासारखा
दगड ठेवण्याआधी थोडा आत गेलेला भाग असतो. त्याला स्कंध म्हणजे खांदा
म्हणतात. वरच्या रुंद वजनदार अमलसाराच्या दगडाला आधार देण्यासाठी इथे स्कंधावर
सिंह आणि चतुर्भुज आकृत्यांचा आधार दिला आहे. वजनदार अमलसाराला आधार देणे आणि
स्थापत्य सौंदर्य वाढवणे हे दोन्ही उद्देश साध्य झाले आहेत.
विस्तीर्ण आकारमान व सुंदर सजावटीची रचना
यामुळे २९ मीटर उंचीचा मंडप - जगमोहन
गाभाऱ्याला तुल्यबल आहे. छपराच्या मजल्यांना ज्या शोभिवंत दर्शनी पट्टया
आहेत त्यांच्यावर पायदळ, घोडदळ, मिरवणुकीचे हत्ती आणि काही इतर देखावे असून त्यांचे दोन गट
आहेत. ह्या प्रत्येक गटात 'भो’ म्हणजेच
घोड्याच्या नालासारख्या अर्धगोलाकार खिडक्या दाखवल्या आहेत. त्यामधे सिंह
दाखवले आहेत. ह्या मंदिराची एकंदरीने परिपक्व व परिणत स्वरूपाची योजनाबद्ध रचना, त्याच्या अवयवांची
प्रमाणबद्धता, प्रभावी आकार, कळसाचा छानदार बाक आणि त्याच्या स्थापत्यविशेषाने
व सुबक बांधणीने त्याला प्राप्त झालेले वैभवशाली स्वरूप ह्या अंगभूत गोष्टी लक्षात
घेता ह्या मंदिराला भारतीय स्थापत्यकलेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान
असल्याचे जाणवते.
कला आणि साहित्य
या पवित्र स्थानाला एकाम्र क्षेत्र असं नाव आहे.एकाम्र पुराण या
उपपुराणात किंवा लघुपुराणात या स्थानाविषयीचे महात्म्य आपल्याला दिसून येते.
येथील उत्सव हे भक्तांचे आकर्षण आहेत.श्रद्धा आणि उत्साह यांनी
परिपूर्ण असे विशेष उत्सव आणि त्यांचे वर्णन प्रत्यक्ष भगवान शिवाने एकाम्र पुराण
या ग्रंथात सांगितल्याचे उल्लेख आपल्याला दिसून येतात.तेराव्या शतकातील हे पुराण
लिंगराजाविषयी आपल्याला माहिती देणारे परिपूर्ण असा दस्तावेज आहे.
एकाम्रवृक्षः तत्र आसीत् पुरा कल्पे द्विजोत्तमः। नाम्ना तस्यैव तत् क्षेत्रं एकाम्रं इति श्रुतम् ।।६१.२
वितनोति स्वयंभूति भूर्भुवस्वः प्रकाशित। लिड्गमूर्ति स्वयं भूत्वा भुवनानि चतुर्दशा।।६१.३
कपिल
पुराणामध्येही श्री लिंगराज आणि त्याच्या भक्तीविषयी वर्णन केलेलं आढळते.
एकाम्रविपिने विप्राः लिंड्गं साक्षात् सनातनम् नैवेद्यं यस्य वाञ्छति शक्राद्यास्रिदिवौकसः।। 13.33
तस्य श्रीलिंड्गराजस्य ध्वजारोपणमुत्तमम् । यः करोति नरःश्रेष्ठः स शिवत्वं च गच्छति।। 13.37
शिव मंदिरात विष्णुच्या भक्तीचा प्रभाव जाणवणारे मंदिर लिंगराज! शिव
आणि विष्णू या दोन्ही देवतांचा आदर करणारे बाराव्या शतकातील गंग राजांचे घराणे!
त्यामुळे येथे उत्सवी काळात शिवाचे तुळसीदलानेही पूजन केले जाते.जगन्नाथपुरी येथील
मंदिरात संपन्न होणारे उत्सव हे लिंगराज मंदिरातही साजरे होतात आणि दोन भिन्न
रूपात प्रकटलेल्या एकाच चैतन्यतत्वाचे पूजन भक्तांना अनुभवायला मिळते.
एकाम्र
पुराणानुसार उत्सवांचे वर्णन खालीलप्रमाणे
चतुर्दश्या च संक्रान्त्या छायायात्रा समाचरेत्
।।६५.४
मार्गशीर्षे शुभे मासे आदौ च प्रथमाष्टमी ।
तत्रैक मासे षष्ट्या तु मम प्रावरणोत्सवम्
।।६५.२३
स्नपन पुष्य पौर्णिम्यां तथा वन्दापना नृप।
ततो मकरसंक्रांतौ मल्लिड्गो घृतकम्बलम् ।।६५.२४
यात्रा मे माघ सप्तम्यां भास्करेश्वर सन्निधौ।
माघ कृष्णचतुर्दश्यांशिवरात्रिव्रत मम।।६५.२५
आषाढ शुक्लाष्ट्म्या तु पर्शुर्रामस्य सन्निधौ
नय मां तत्र यत्नेन शिबिकास्थ त्रिलोचनम् ।।६५.२६
उत्सवाच्या दिवशी लिंगराज मंदिरात विशैष पद्धतीने देवाचा दिनक्रम
आखलला दिसून येतो. द्वारपीठ,मंगलारती,अवकाश,महास्नान,
वेश,सूर्यपूजा,द्वारपालपूजा,गोपालबल्व,सकलधूप,भोग,बिराकेशरी
भोग,दीपगृह धूप,पहुडा,संध्याधूप,बडा
शृंगार,शयन असे विविध उपचार शिवाला अर्पण केले जातात. उत्सवीकाळात जोगी,चंद्रशेखर,दामोदर
अशा विवाध रूपातील वेशभूषा शिवांना अर्पण केली जाते.
या सर्व प्रदेशात संस्थानिक व जमीनदारी पद्धती प्रचलित
होती.त्यावेळी भूमी व पाण्यासाठीची
भाडेवसूली करण्यात येत असे.आजही पुरी येथील जगन्नाथ मंदिर व लिंगराज मंदिर या
ठिकाणी या प्रथेचे स्मरण म्हणून जमीनदारांच्या कुटुबातील वंशज विशेष पूजा
करतात.वामन जयंतीच्या दिवशी या पूजेचे आयोजन केले जाते.श्रीमंत कुटुंबांचे नवे
वर्ष या दिवशी सुरु होते.याला सुनियन असे म्हटले जाते.
चैत्र शुक्ल अष्टमीला प्रथमाष्टमी
म्हटले जाते.या दिवशी चंद्रशेखराची चल प्रतिमा म्हणजे मंदिरातून उत्सवीकाळात बाहेर
पडणारी मूर्ती पालखीतून पापनाशिनी कुंडात
स्नानासाठी नेली जाते.त्यानंतर विशेष महानैवेद्य दाखविला जातो.
याखेरीज रथयात्रा हे ओरिसाचे विशैष्ट्य येथेही पहायला मिळते.या
यात्रेला रुकुणा रथयात्रा म्हणतात ज्यामधे भाविक हा रथ ओढतात.
अक्षय्य तृतीयेला सुरु होणारा चंदनयात्रा उत्सव म्हणजे
उन्हाळ्यात देवतेला थंडावा देण्याचे उपचार.हा उत्सव २२ दिवस सुरू असतो.या काळात
बिंदुसार सरोवरात नौकेमधे बसून शिवांची चलमूर्ती
नौकानयन करते व उन्हाळ्यापासून आल्हाद
मिळवते अशी धारणा आहे.मंदिरातील सेवेकरीही या काळात सरोवरात स्नान करतात.
आपण ज्याप्रमाणे विष्णुंचे चातुर्मास्य शयन मानतो त्याप्रमाणे शिवाचे
शयनही या प्रांतात प्रचलित असल्याचे दिसते. आषाढ चतुर्दशीला शयन चतुर्दशी म्हणतात त्यादिवशी भगवान शाव
निद्राधीन होतात.कार्तिक चतुर्दशीला उत्थापन चतुर्दशी म्हणतात कारण त्या
दिवशी शिव झोपेतून जागे होतात.
गुरुपंचमी या दिवशी रामेश्वराच्या मंदिरात
शिवपार्वती उत्सव संपन्न केला जातो.यासाठी भाविक आवर्जून उपस्थित राहतात.विवाह
संपन्न झाल्यावर शीतलाषष्ठीच्या दिवशी शिवपार्वती मूळ मंदिरात परत येतात.शक्तीच्या
साहचर्याशिवाय शिवाचा व्यापार अपूर्ण आहे!
मार्गशीर्ष षष्ठीला प्रावरण षष्ठी म्हटले जाते.या दिवशी
शिवाला नवी लोकरीची उबदार वस्रे अर्पण केली जातात,फुलांनी विशेष
पूजन केले जाते.
हंडी भांग जत्रा हा थोडा वेगळा उत्सव आहे ज्यामधे भगवान
लिंगराज कपिलनाथ मंदिरात आपल्या परिवारासह जातात.मातीच्या नव्या भांड्यांमधे
त्यादिवशी भाविक मंदिर परिसरात स्वयंपाक करतात,नैवेद्य दाखविला
जातो व त्यानंतर ती भांडी फोडली जातात अशी पद्धती दिसून येते.
उत्सवांनी ,यात्रांनी परिपूर्ण अशा या मंदिरात
पवित्रारोपण,यमद्वितीया असेही विशेष दिवस उत्साहाने साजरे केले जातात. हे सारे वाचूनच
आपण जणू काही या उत्सवांचा आनंद प्रत्यक्ष घेत आहोत असे वाटेल हे नक्की!
वेधक
आणि वेचक
- लिंगराज मंदिर परिसरात दरवर्षी साधारण चौदा उत्सव साजरे केले जातात
- भुवनेश्वर मधील रामेश्वर मंदिर हे लिंगराज मंदिरापासून २ किमी अंतरावर नवव्या शतकात बांधलेले भगवान लिंगराजच्या मावशीचे, मौसीमा मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. रामनवमीच्या एक दिवस अगोदर रुकुना रथयात्रेदरम्यान भगवान लिंगराज या मंदिराला भेट देतात
कलिंग स्थापत्य, उत्कल कला आणि सनातन भक्तीची शतकानुशतके जपलेली जुनी जिवंत परंपरा ज्या आधारावर उभी आहे त्याचे भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क येथील सूर्य नारायण मंदिर हे महत्वाचे त्रिस्तंभ आहेत.







Comments
Post a Comment